पावसाचा कहर, ५ राज्यांत १६ ठार, खराब हवामानामुळे केदारनाथ यात्रा स्थगित करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2023 07:55 AM2023-06-27T07:55:53+5:302023-06-27T07:56:53+5:30
Rain In India: देशभरात झालेल्या पावसामुळे पाच राज्यांमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. राजस्थानमध्ये वीज पडण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला.
नवी दिल्ली : देशभरात झालेल्या पावसामुळे पाच राज्यांमध्ये १६ जणांना आपला जीव गमवावा लागला. राजस्थानमध्ये वीज पडण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला. पुढील २ दिवस मध्य प्रदेशसह २५ राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंडमध्ये पावसामुळे तीन जणांचा मृत्यू झाला. अयोध्येत भिंत कोसळून दोघांचा मृत्यू झाला. हिमाचल प्रदेशात मंडी जिल्ह्यात २०० लोक पुरात अडकले आहेत.
विदर्भात चाैघे दगावले
नागपूर : विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांत चार दिवसांपूर्वी मान्सूनने एंट्री केली. विश्रांतीनंतर सोमवारी पाऊस पुन्हा सक्रिय झाला. अहेरी, भामरागडमध्ये दमदार पाऊस झाला. यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात प्रत्येकी दोघा जणांचा मृत्यू झाला. नागपुरात रविवारी उशिरा रात्री सुरू झालेला पाऊस साेमवारी सकाळपर्यंत संथपणे संततधार सुरू हाेता. अमरावती, यवतमाळसह पश्चिम विदर्भात अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.