यमुनेचा दिल्लीला विळखा! जनजीवन ठप्प, मोठ्या प्रमाणावर हानी; हजारो लोकांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2023 10:09 AM2023-07-14T10:09:39+5:302023-07-14T10:09:54+5:30
दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नसताना परप्रांतांमधून आलेल्या महापुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीसह बदरपूर ते जैतपूरपर्यंत किनाऱ्यावरील विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सुनील चावके
नवी दिल्ली : हरयाणा, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांतील अतिवृष्टीमुळे यमुना नदी बेकाबू होऊन २०८.६२ मीटर ऐतिहासिक पातळीवर वाहू लागल्यामुळे गुरुवारी राजधानी दिल्ली पुराच्या विळख्यात सापडली. धोक्याच्या पातळीच्या २०५.३३ मीटरपेक्षा तब्बल सव्वातीन मीटर वर वाहणाऱ्या यमुना नदीने पूर्व आणि उत्तर दिल्लीतील विविध भागांना वेढा घालून दिल्लीचे जनजीवन पार विस्कळीत करून टाकले आहे. सुमारे २० हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.
दिल्लीत तीन दिवसांपासून पाऊस नसताना परप्रांतांमधून आलेल्या महापुराचे पाणी शिरल्यामुळे पूर्व आणि उत्तर दिल्लीसह बदरपूर ते जैतपूरपर्यंत किनाऱ्यावरील विविध भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, यमुनेच्या पाण्याची पातळी शुक्रवारपर्यंत ओसरू लागेल, असा दिलासा देणारा अंदाज केंद्रीय जल आयोगाने वर्तवला आहे.
काठावरील लोकांचे हाल
पाण्यामुळे यमुनेच्या काठावर राहणाऱ्या सुमारे ४५ हजार रहिवाशांपैकी बुधवारी ९ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते.
हिमाचलमध्ये २९० पर्यटक अडकले
१०२० महामार्ग बंदच
६० हजार पर्यटकांना आतापर्यंत बाहेर काढले
२५ हजार पर्यटकांना कुल्लू आणि मनालीतून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले.
८८ लोकांचा मृत्यू, तर १०० जखमी
१६ लोक अद्याप बेपत्ता
१,३१२ कोटी रुपयांचे नुकसान (केंद्र सरकारनुसार)
४,००० कोटी रुपयांचे नुकसान (राज्य सरकारनुसार)
७२ जिल्ह्यांना पुराचा वेढा
भारतातील ७२ टक्के जिल्ह्यांना पुराचा गंभीर फटका बसला असून, त्यापैकी केवळ २५ टक्के जिल्ह्यांमध्ये पूर अंदाज केंद्रे किंवा पूर्व चेतावणी प्रणाली असल्याची माहिती समोर आली आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सर्वांत कमी पूर अंदाज केंद्रे आहेत. त्यामुळे पर्यटकांना माहिती मिळण्यात अडचण आली.