छत्तीसगड मद्य घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, मुलासह माजी IAS अनिल टुटेजा यांना अटक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2024 13:10 IST2024-04-21T12:18:21+5:302024-04-21T13:10:18+5:30
Chhattisgarh Liquor Scam Case : माजी आयएएस अनिल तुटेजा आणि त्यांच्या मुलाला चौकशीसाठी पाचपेडी नाका येथील ईडीच्या सब-झोनल कार्यालयात नेण्यात आले आहे.

छत्तीसगड मद्य घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई, मुलासह माजी IAS अनिल टुटेजा यांना अटक!
रायपूर : छत्तीसगडमध्ये 2000 कोटी रुपयांच्या कथित मद्द घोटाळ्याप्रकरणी माजी आयएएस अनिल टुटेजा आणि त्यांचा मुलगा यश टुटेजा यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. आर्थिक गुन्हे अन्वेषण ब्युरो (ईओडब्ल्यू ) कार्यालयामध्ये आपला जबाब नोंदवण्यासाठी अनिल टुटेजा आणि यश टुटेजा पोहोचले होते. पाच तासांच्या चौकशीनंतर जबाब नोंदवून ईओडब्ल्यू कार्यालयातून बाहेर पडत असताना ईडीच्या पथकाने दोघांना अटक केली.
माजी आयएएस अनिल तुटेजा आणि त्यांच्या मुलाला चौकशीसाठी पाचपेडी नाका येथील ईडीच्या सब-झोनल कार्यालयात नेण्यात आले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच मद्य घोटाळा प्रकरणात मनी लाँड्रिंगचे आरोप फेटाळून लावले होते आणि मनी लाँड्रिंग प्रकरण रद्द केले होते. प्रत्युत्तरादाखल, ईडीने मद्य घोटाळ्याप्रकरणी नवीन माहिती प्रकरण माहिती अहवाल (ईसीआयआर) नोंदवला आणि नव्याने तपास सुरू केला. अनिल टुटेजा आणि त्यांच्या मुलाचीही नावे (ईसीआयआर) मध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ईडीच्या अहवालानंतर ईओडब्ल्यूने मद्य घोटाळा प्रकरणाचा तपास सुरू केला होता. सर्वोच्च न्यायालयाने खटला रद्द केल्यानंतर ईडीने नवीन एफआयआर नोंदवला. आता दोन्ही तपास यंत्रणा मद्य घोटाळ्याचा तपास करत आहेत. यापूर्वीच्या एफआयआरमध्ये 70 जणांची नावे आहेत. मद्य घोटाळ्यात तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर लगेचच ईओडब्ल्यूच्या पथकाने अरविंद सिंगला 3 एप्रिलला आणि अन्वर ढेबरला दुसऱ्या दिवशी अटक केली. उत्पादन शुल्क विभागाचे माजी एमडी एपी त्रिपाठी यांना बिहारमधून अटक करण्यात आली असून, ते 25 एप्रिलपर्यंत ईओडब्ल्यू रिमांडवर आहेत.