...म्हणून भाजपाच्या कार्यक्रमाला हेल्मेट घालून गेले पत्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 03:57 PM2019-02-07T15:57:47+5:302019-02-07T15:59:38+5:30
छत्तीसगडच्या रायपूरमधील प्रकार
रायपूर: छत्तीसगडमधील पत्रकारांनी भाजपा नेत्यांना हेल्मेट घालून प्रश्न विचारले. हातात माईक आणि डोक्यावर हेल्मेट अशा अवतारात पत्रकारांनी भाजपा नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतल्या. भाजपा नेत्यांनी गेल्या आठवड्यात एका पत्रकाराला मारहाण केली होती. त्याचा पत्रकारांनी अनोख्या पद्धतीनं निषेध केला.
भाजपा नेत्यांना योग्य तो संदेश देण्यासाठी हेल्मेट घालून भाजपाच्या कार्यक्रमांचं वार्तांकन करत असल्याचं काही पत्रकारांनी सांगितलं. भाजपा नेत्यांनी पुन्हा हल्ला केल्यास हेल्मेट कामी येईल, अशी भावना काहींनी व्यक्त केली. शनिवारी पत्रकार सुमन पांडे यांना भाजपा नेत्यांनी मारहाण केली. 'नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवाची कारणमीमांसा करण्यासाठी भाजपानं बैठक बोलावली होती. त्यामध्ये भाजपा नेत्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचं चित्रीकरण करत असताना भाजपा नेत्यांनी मारहाण केली,' असं पांडे यांनी सांगितलं.
हेलमेट में पत्रकार: पांच दिन पहले रायपुर में भाजपा मुख्यालय के भीतर पत्रकारों की पिटाई के बाद से लगातार प्रदर्शन कर रहे पत्रकारों ने भाजपा नेताओं से बातचीत करते समय हेलमेट पहनना शुरु कर दिया है. @AmitShah@BJP4India@PMOIndia@bhupeshbaghelpic.twitter.com/SsnQ3mHRZ1
— Alok Putul (@thealokputul) February 6, 2019
'भाजपा नेत्यांच्या आढावा बैठकीचं वार्तांकन करण्यासाठी मी गेलो होतो. तिथे रायपूर भाजपाच्या अध्यक्षांसह अन्य काही नेते उपस्थित होते. तेव्हा तिथे अचानक काही नेत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. ती चित्रीत करत असताना उत्कर्ष त्रिवेदी आणि राजीव अग्रवाल यांनी मला मारहाण केली. त्यांनी माझा फोन काढून घेतला आणि चित्रफित डिलीट केली. यानंतर 20 मिनिटं मला एका खोलीत ठेवण्यात आलं,' असं पांडे म्हणाले.
या प्रकरणाची माहिती पत्रकारांनी पोलिसांना दिली. त्यानंतर भाजपाच्या चार पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. राजीव अग्रवाल, विजय व्यास, उत्कर्ष त्रिवेदी आणि डिना डोगरे अशी अटक करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची नावं आहेत. या प्रकरणी भाजपा प्रवक्ते सच्चिदानंद उपासने यांनी सुमन पांडे यांची माफी मागितली.