आई-वडिलांनी काबाडकष्ट करून वाढवलं, जमिनीसह घर विकलं; लेकाने कष्टाचं सोनं केलं, झाला IAS
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:07 AM2022-12-02T09:07:23+5:302022-12-02T09:14:44+5:30
प्रदीप सिंहची यांची सक्सेस स्टोरी अनेकांना जगण्याची नवी उमेद देते. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मुलगा वयाच्या 23 व्या वर्षी IAS झाला आहे.
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी या शक्य करता येतात. अशीच एक प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. ऑल इंडिया रँक 26 स्कोरर प्रदीप सिंहची यांची सक्सेस स्टोरी अनेकांना जगण्याची नवी उमेद देते. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा मुलगा वयाच्या 23 व्या वर्षी IAS झाला आहे. प्रदीप सिंह नेहमी सांगतात की, आयएएस अधिकारी होण्यासाठी त्यांनी जो संघर्ष केला तो त्याच्या आई-वडिलांनी केलेल्या बलिदानापुढे काहीच नाही.
1996 मध्ये बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात जन्मलेल्या प्रदीप यांचं कुटुंब इंदूरला झालं. प्रदीप यांनी आपलं शालेय शिक्षण इंदूरमध्ये केलं आणि IIPS DAVV कॉलेजमधून B.Com (ऑनर्स) पदवी प्राप्त केली. मध्यमवर्गीय कुटुंबातील, प्रदीप यांचे वडील पेट्रोल पंपावर काम करतात आणि आई गृहिणी आहे. प्रदीप यांचा मोठा भाऊ एका खासगी कंपनीत काम करतो. प्रदीप यांनी पदवीनंतर लवकरच यूपीएससी सिव्हिल परीक्षेला बसायचे ठरवले,
वडिलांनी घर आणि जमीन विकली
मर्यादित साधनांमुळे कोचिंगसाठी दिल्लीला जाणे प्रदीप यांना थोडं अवघड वाटत होतं, परंतु प्रदीप यांचे वडील सपोर्टिव्ह होते. वडिलांनी आपल्या मुलावर पूर्ण विश्वास ठेवला आणि त्याच्या अभ्यासाला हातभार लावण्यासाठी, पुढील शिक्षणासाठी दिल्लीला पाठवण्यासाठी आपलं घर देखील विकलं, प्रदीप यांच्या वडिलांनी त्यांचा अभ्यास आणि दिल्ली व इतर किरकोळ खर्च भागवण्यासाठी गावातील वडिलोपार्जित जमीनही विकली.
लेकाने कष्टाचं सोनं केलं
कुटुंबाने केलेल्या बलिदानाची परतफेड करण्यासाठी, प्रदीप यांनी खूप मेहनत घेतली आणि UPSC परीक्षा 2018 ला दिली. प्रदीप यांनी त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ती पास केली आणि गुणवत्ता यादीनुसार IRS अधिकारी होण्यासाठी निवड झाली. पण प्रदीप यांचे ध्येय आयएएस अधिकारी बनण्याचे होते आणि म्हणून प्रदीप पुन्हा यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा 2019 ला बसले आणि यावेळी ऑल इंडिया रँक 26 सह आयएएस अधिकारी झाले, तेही वयाच्या 23 व्या वर्षी. त्यांच्या कुटुंबीयांच्या कष्टाचं यामुळे सोनं झालं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"