"दिल्लीत गोळीबार सर्रास, दहशतीचे वातावरण...", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:51 IST2024-12-01T18:48:43+5:302024-12-01T18:51:24+5:30
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही सिंगला स्वीट्ससमोर उभे आहोत, हे खूप व्यस्त मार्केट आहे.

"दिल्लीत गोळीबार सर्रास, दहशतीचे वातावरण...", अरविंद केजरीवालांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेवरून माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. रविवारी अरविंद केजरीवाल दिल्लीतील टिळक नगर येथील कार शोरूममध्ये गेले होते. याठिकाणी जून महिन्यात खंडणीसाठी गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती. याठिकाणी अरविंद केजरीवाल यांनी पीडित कुटुंबाचीही भेट घेतली. यानंतर सिंगला स्वीट्स येथेही भेट दिली. येथे काही महिन्यांपूर्वी दोन दुचाकीस्वारांनी गोळीबार केला होता.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, आम्ही सिंगला स्वीट्ससमोर उभे आहोत, हे खूप व्यस्त मार्केट आहे. काही महिन्यांपूर्वी सिंगला स्वीट्स येथे दोन दुचाकीस्वार आले आणि त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. शूट आऊटच्या काही दिवस आधी दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. शूट आऊटनंतर पुन्हा फोन आला आणि तुम्हाला काहीही होऊ शकते, अशी धमकी दिली. दिल्लीत असे गोळीबार सामान्य झाले आहेत. नागलोईला गेलो होतो, तिथेही गोळीबार झाला होता. यावर्षी 160 खंडणीचे कॉल आले आहेत, जे पोलीस रेकॉर्डमध्ये आले आहेत. अनेकजण भीतीमुळे सांगत नाहीत.
सध्या दिल्लीत दहशतीचे वातावरण आहे. आपण अशी दिल्ली कधीच पाहिली नव्हती. आम्ही शांतताप्रिय लोक आहोत. आपल्याला शांततेत राहायचे आहे. काही लोक इतर राज्यात व्यवसाय घेऊन जात आहेत, असे अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. तसेच, हे गँगस्टर 17-17 वर्षांच्या मुलांचा वापर करत आहेत. दुसरीकडे, बेरोजगारी पसरत असून अशा कामात बेरोजगार मुलांना कामाला लावले जात आहे. मला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना सांगायचे आहे की, आम्हाला राजकारण नको आहे. तुम्हाला वाटेल ते काम करा, असे म्हणत अरविंद केजरीवाल यांनी निशाणा साधला.
नरेश बालियान यांच्या अटकेवरूनही हल्लाबोल
आपचे आमदार नरेश बालियान यांनी अटक करण्यात आली आहे. या अटकेचा संदर्भ देत अरविंद केजरीवाल म्हणाले की, नरेश बालियान यांना 35-40 वेळा धमकीचे फोन आले होते. पीडित हे आमदार असून त्यांना अटक करण्यात आली आहे. हा कोणता संदेश दिला जात आहे? तुम्हाला धमक्या दिल्यास आणि तुम्ही तक्रार केल्यास तुम्हाला अटक केली जाईल. पीडित लोकांना आपण संरक्षण दिले पाहिजे, असे सांगत अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.