वादग्रस्त ठिकाणी मंदिर, मशीद उभारा
By admin | Published: November 15, 2016 02:05 AM2016-11-15T02:05:27+5:302016-11-15T02:05:27+5:30
अयोध्या वाद सोडविण्यासाठी फैजाबाद विभागीय आयुक्तांना नवा प्रस्ताव देण्यात आला असून, त्यात वादग्रस्त ठिकाणी मंदिर आणि मशीद उभारण्याची सूचना
अयोध्या/फैजाबाद : अयोध्या वाद सोडविण्यासाठी फैजाबाद विभागीय आयुक्तांना नवा प्रस्ताव देण्यात आला असून, त्यात वादग्रस्त ठिकाणी मंदिर आणि मशीद उभारण्याची सूचना करण्यात आली आहे. यात हिंदू व मुस्लीम अशा दोन्ही समाजाच्या लोकांनी सह्या केल्या.
या प्रस्तावासाठी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पलोक बसू यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या प्रस्तावावर दोन्ही धर्मांच्या १० हजार लोकांची स्वाक्षरी असल्याचा दावा करण्यात आला आहे. ‘मला अयोध्या वादाबाबत एक निवेदन आणि लोकांच्या सह्या असलेल्या सत्यप्रती मिळाल्या आहेत,’ असे विभागीय आयुक्त आणि वादग्रस्त स्थळाचे व्यवस्थापक सूर्यप्रकाश मिश्रा यांनी सांगितले. हा प्रस्ताव रविवारी सादर करण्यात आला. त्यावर १०,५०२ लोकांच्या सह्या आहेत. बसू म्हणाले की, ‘आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या प्राधिकृत व्यक्तीमार्फत (फैजाबाद विभागीय आयुक्त) तडजोड प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वोच्च न्यायालय शांतता आणि सौहार्दाच्या जनभावनांचा आदर करेल, अशी आशा आहे. (वृत्तसंस्था)