Raj Thackeray: राज ठाकरेंच्या भाषणानंतर गोवा, कर्नाटकातही भोंगे हटवण्याच्या मागणीनं जोर धरला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 06:21 PM2022-04-13T18:21:59+5:302022-04-13T18:22:20+5:30
मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजाण दिली जाते त्यावरून गोव्यातही वाद सुरू झाला आहे.
नवी दिल्ली – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यानंतर पुन्हा एकदा ठाण्यात उत्तर सभा घेताना मशिदीवरील भोंगे यावर परखड भूमिका मांडली. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे सरकारने मौलवींसोबत चर्चा करून हटवावे अन्यथा मशिदीसमोर भोंगे लावत हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी व्यासपीठावरून केवळ राज्यातच नव्हे तर देशातील प्रत्येक मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर तेथेही हनुमान चालीसा लावावी असं आवाहन केले होते. आता राज ठाकरेंच्या विधानाचं समर्थन करण्यासाठी अनेक हिंदू संघटना पाठिशी आल्या आहेत.
कर्नाटकात भाजपानेही मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. तर गोव्यात हिंदू जनजागृती समितीने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून गोव्यातील मशिदीवरील भोंगे हटवावे असं निवेदन दिले आहे. मशिदीवरील लाऊडस्पीकरवरून अजाण दिली जाते त्यावरून गोव्यातही वाद सुरू झाला आहे. गोव्यातील हिंदुत्ववादी संघटना दक्षिण आणि उत्तर गोव्यातील मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी केली आहे. भाजपा सरकारने याबाबत प्रशासकीय आदेश लागू करावेत असं आवाहन केले आहे.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन घरात केले पाहिजे. महाराष्ट्रात आम्हाला जातीय दंगली करायच्या नाहीत, परंतु राज्याच्या गृह खात्याने सर्व मौलवींना बोलावून मशिदींवरील भोंगे ईदपूर्वी ३ मेपर्यंत उतरवायला भाग पाडावे. तसे झाले नाही आणि जेथे भोंगे सुरू असतील तेथे हनुमान चालीसा वाजवली जाईल. माझ्या भात्यात आणखीही बाण आहेत. मला ते बाहेर काढायला लावू नका,’ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी ठाण्याच्या सभेत दिला.
तसेच यापूर्वी वेळोवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबत आपण भूमिका घेतली आहे. नमाज पढण्यासाठी रस्ते, फुटपाथ अडवणे व बारा महिने लाऊडस्पीकर लावण्यास आपला विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने लाऊडस्पीकर लावू नये, असे मत व्यक्त केले आहे; परंतु मतांकरिता निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे सरकारने वेळीच हस्तक्षेप करावा, अन्यथा अन्य धर्मीयांना कसा त्रास होतो, ते हनुमान चालीसा लावून दाखवावे लागेल असंही राज ठाकरेंनी सांगितले.