थलायवा रजनीकांत लवकरच राजकारणात, युद्धासाठी तयार राहण्याचं आवाहन
By Admin | Published: May 20, 2017 12:06 PM2017-05-20T12:06:54+5:302017-05-20T12:09:01+5:30
धीर धरा, आपल्या कामावर लक्ष द्या, पण युद्धासाठी तयार राहा अशी साद रजनीकांत यांनी चाहत्यांना घातली आहे
>ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 20 - दाक्षिणात्य सुपरस्टार थलायवा रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यावेळी रजनीकांत यांनी तामिळनाडूतील प्रमुख राजकीय पक्ष द्रमुक किंवा अण्णाद्रमुकसोबत न जाता दुस-या एखाद्या पक्षाला साथ देत गरिब आणि गरजूंसाठी लढत लोकांना दुसरा पर्याय देणार असल्याचंही स्पष्ट केलं. "धीर धरा, आपल्या कामावर लक्ष द्या, पण युद्धासाठी तयार राहा", अशी सादच त्यांनी आपल्या चाहत्यांना घातली. राजकारणाच्या प्रश्नांना दुर्लक्षित करणा-या रजनीकांत यांनी यावेळी मात्र आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलं.
रजनीकांत यांनी पाच दिवस आपल्या चाहत्यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्यासोबत फोटो काढत मनमुराद आनंद लुटला. रजनीकांत राजकारणात प्रवेश करण्याच्या बातम्या येत असतानाच त्यांनी हा दौरा सुरु केला होता. सुरुवातीला मात्र त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला. मात्र शुक्रवारी शेवटच्या दिवशी त्यांनी मोकळेपणाने प्रश्नांची उत्तर देत आपलं मत मांडलं.
"जेव्हा युद्ध होईल तेव्हा पाहता येईल. तोपर्यंत धीर ठेवला पाहिजे", असं रजनीकांत यावेळी बोलले. रजनीकांत यांनी केलेल्या युद्धाचा उल्लेख म्हणजे निवडणूक असल्याचं बोललं जात आहे. कारण तामिळनाडूत 2019 मध्ये लोकसभा निवडणूक होणार असून या निवडणुकीच्या निमित्ताने रजनीकांत राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तामिळी लोकांनीच मला हे आयुष्य दिलं आहे सांगत त्यांनी त्यांचे आभार मानले. "व्यवस्था भ्रष्ट झालीय. आपण सगळ्यांनी मिळून ती बदलायला हवी. ज्या लोकांनी मला यशाच्या शिखरावर नेलं त्यांची सेवा करण्यात गैर काय आहे?, असा सूचक प्रश्नही त्यांनी केला.
याआधी जेव्हा रजनीकांत यांना राजकारण प्रवेशावर विचारण्यात आलं होतं तेव्हा ते बोलले होते की, "मी राजकारणात पडणार नाही, असे मी आत्ता सांगून टाकले तर ज्यांचे स्वत:चे आर्थिक भले करून घेण्याचे मनसुबे आहेत असा माझ्या चाहत्यांचा एक वर्ग नाराज होईल. मी राजकारणात उतरलोच तर अशा चाहत्यांना मी माझ्याजवळ फिरकूही देणार नाही. त्यामुळे त्यांनी अशी आशा सोडून द्यावी, असे मी त्यांना सांगेन.
"मी सच्चा तामिळी आहे. गेली ४४ वर्षं मी तुमच्यासोबत आहे. तुम्हीच मला मोठं केलंत. उद्या जर तुम्ही मला तामिळनाडूच्या बाहेर काढलंत, तर मी अन्य कुठल्याही राज्यात जाणार नाही. थेट हिमालयात जाईन", असा भावनिक सूर रजनीकांत यांनी लावला.
सुपरस्टार रजनीकांत असेही म्हणाले होते, "की इतरांची उदाहरणे देऊन चाहते मला पत्र पाठवून विचारतात की त्यांच्याप्रमाणे तुम्ही कधी पुढे जाणार, प्रगती करणार? मागून आलेले अनेक जण पुढे गेले व कोणी नगरसेवक तर कोणी मंत्री झाले, असे ते कळवितात. काही चाहत्यांनाही अशी पदे मिळावीत असे वाटते. त्यांच्यादृष्टीने अशी इच्छा बाळगणे बरोबरही असेल, मी त्यांना चूक म्हणणार नाही. पण असे पैशासाठी राजकारणात पडून इच्छिणाऱ्यांना रागवावे की हसावे, हे मला कळत नाही. रजनीकांत म्हणाले की, यापूर्वी अनेकदा सांगितले तेच मी पुन्हा सांगेन. मी परमेश्वराच्या हातचे बाहुले आहे. तो सध्या माझ्याकडून अभिमय करून घेत आहे म्हणून मी अभिनेता आहे. उद्या परमेश्वरी इच्छेने जी काही भूमिका बजावावी लागेल ती मी मनापासून पार पाडेन".