राज ठाकरेंनी माफी मागावी, हिंदू धर्माचार्यांचे आदेश; ५ लाख लोक अयोध्येत येणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2022 12:56 PM2022-05-10T12:56:45+5:302022-05-10T12:57:52+5:30
राज ठाकरेंना माफी मागण्याची एक संधी आहे. माफी मागितली नाही तर झारखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार याठिकाणी आयुष्यात कधीही येऊ शकणार नाही असं बृजभूषण सिंह यांनी सांगितले.
नंदिनीनगर – मनसे प्रमुख राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी उत्तर प्रदेशची माफी मागावी अन्यथा अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही अशी भूमिका घेत भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी यूपीत मोठं शक्तीप्रदर्शन केले आहे. राज ठाकरेंच्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी साधू महंत यांची बैठक होत आहे. या बैठकीत हिंदू धर्माचार्य या नात्यानं राज ठाकरेंना माफी मागण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज ठाकरेंनी माफी मागितल्यास इतक्याच संख्येने त्यांचे स्वागत करू असंही साधू महंतांनी म्हटलं आहे.
यावेळी खासदार बृजभूषण सिंह म्हणाले की, उत्तर भारतीयांचा अपमान राज ठाकरेंनी केला. राज ठाकरेंना माफी मागावीच लागेल. राज ठाकरेंना उत्तर भारतीयांसमोर नतमस्तक व्हावं लागेल. जोपर्यंत राज ठाकरे माफी मागत नाही तोवर अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही. राज ठाकरेंच्या विरोधाला ५ लाख लोक असतील. राज ठाकरे विमानातून यावे अन्यथा रेल्वेतून यावं त्यांना उतरू देणार नाही. माफी मागितली तरच जनतेचा राग कमी होईल. आम्ही राजकारणासाठी हे करत नाही. हे जात, धर्माचं आदोलन नाही. माफी मागितली नाही तर राज ठाकरेंना महाराष्ट्रातच राहावं. आमची माफी मागितली नाही तरी चालेल संतांची माफी मागावी असं त्यांनी सांगितले.
तसेच राज ठाकरेंना माफी मागण्याची एक संधी आहे. माफी मागितली नाही तर झारखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, बिहार याठिकाणी आयुष्यात कधीही येऊ शकणार नाही. तुम्ही केलेले पाप तुम्हालाच आठवेल. राज ठाकरेंना माफ करायचं आहे परंतु ते माफी मागायला तयार नाही. साधूंची माफी मागितल्यास अयोध्येत येऊ देणार. संताची माफी मागा तुम्ही देशाचे नेते व्हाल. महाराष्ट्र माझ्यासाठी आदरनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना मी आदर्श मानतो. संत समाजही छत्रपतींना आदर्श मानतो. माझा विरोध राज ठाकरे व्यक्तीला आहे. महाराष्ट्राला नाही असंही बृजभूषण सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, राज ठाकरे कधी महाराष्ट्राच्या बाहेर आले नाहीत त्यामुळे हा विरोध करता आला नाही. आता समोर यावं २००८ मध्ये उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली. तेव्हापासून आमचा हा राग आहे. माझं वैर महाराष्ट्राशी नाही. माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही. राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी ५ लाख लोकांनी ५ जून रोजी अयोध्येत जमावं असं आवाहनही बृजभूषण सिंह यांनी केले आहे.