राज ठाकरे यांच्या सुरक्षेविरुद्धची याचिका फेटाळली
By admin | Published: August 27, 2016 06:07 AM2016-08-27T06:07:47+5:302016-08-27T06:07:47+5:30
राज ठाकरे यांचे सुरक्षा कवच काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला.
नवी दिल्ली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचे सुरक्षा कवच काढून घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी नकार दिला. राज यांच्या सुरक्षेची काळजी राज्य सरकार घेत असल्याचे केंद्राने सांगितल्यानंतर न्यायालयाने हा पवित्रा घेतला.
‘ठाकरे यांना राज्य सरकारने सुरक्षा पुरविली आहे. यात केंद्राचा संबंध नाही, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे मुख्य न्यायाधीश जी. रोहिणी आणि न्यायाधीश संगीता धिंगरा सेहगल यांच्या खंडपीठाने म्हटले. हा या न्यायालयाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता असलेला जनहिताचा मुद्दा नाही. त्यामुळे यावर सुनावणी करू शकत नाही, असे खंडपीठाने नमूद केले. राज ठाकरे घटनात्मक पदावर नाहीत. लोकप्रतिनिधीही नाहीत. त्यामुळे सरकारने दिलेली ‘वाय श्रेणी’ची सुरक्षा काढून घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत केली होती. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>कोणाची होती याचिका
मिथिलेश कुमार पांडे यांनी ही याचिका केली होती. द्वेषमूलक भाषणे करणारे वा ज्यांच्याविरुद्ध गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत अशा खासगी व्यक्तींना सुरक्षा पुरविण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली होती.