Raj Thackerey: "शरद पवारांनी 5 वेळा माफी मागितली असती, ते मोठ्या मनाचे राजकारणी"
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 05:55 PM2022-05-12T17:55:00+5:302022-05-12T17:59:42+5:30
मनसेकडून राज यांना हिंदूजननायक अशी उपाधी दिली असताना उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज यांचा उल्लेख खलनायक असा केला.
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे पुढील महिन्यात 5 जून रोजी अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहेत. तत्पूर्वी त्यांनी मशिदीवरील भोंग्यांना विरोध करत राज यांनी आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. राज यांच्या भूमिकेचं राज्यातील भाजपच्या नेत्यांनी स्वागत केलं. मात्र, राज यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण सिंहांनी विरोध केला आहे. राज यांना अयोध्येत पाऊलही टाकू देणार नाही, असा स्पष्ट इशाराच त्यांनी दिलाय. विशेष म्हणजे ते आजही आपल्या मतावर ठाम आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.
मनसेकडून राज यांना हिंदूजननायक अशी उपाधी दिली असताना उत्तर प्रदेशातील भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी राज यांचा उल्लेख खलनायक असा केला. राज यांच्या कार्यकर्त्यांनी उत्तर भारतीयांना मारहाण केली होती, याची आठवण सिंह यांनी करून दिली. त्यामुळे, 2008 पासून मी राज ठाकरेंचा विरोध करतो, असे ते म्हणाले. मी मराठी लोकांच्या किंवा महाराष्ट्राच्या विरोधात नसून केवळ एका व्यक्तीच्या विरोधात आहे. त्यामुळे, त्या व्यक्तीने उत्तर प्रदेशची माफी मागावी, किंवा येथील संतांची माफी मागावी, असे आवाहन सिंह यांनी केले आहे.
बृजभूषण सिंह हे लोकसभा खासदार आहेत. त्यामुळे, त्यांचे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांचे स्नेहाचे संबंध असल्याचंही त्यांनी सांगितलं. सुप्रिया सुळे या संसदेत बाकावर आमच्यासाठी खायला पदार्थ घेऊन येतात, अशी आठवणही त्यांनी सांगितली. तर, शरद पवार हे मोठ्या मनाचा माणूस आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 5 वेळा माफी मागितली असती, असे म्हणत सिंह यांनी राज ठाकरेंना टोलाही लगावला.
मोदींची माफी मागावी
राज ठाकरेंना विरोध केल्यानंतर भाजप नेत्यांना वाईट वाटायचं कारण नाही. राज ठाकरे हे भाजपचे नेते नाहीत. राज ठाकरेंच्या दौऱ्याचं समर्थन केल्यास भाजपलाही त्यांच्या मताची चिंता नाही का, भाजपला युपीचे मत नको आहेत का? असे म्हणत बृजभूषणसिंह यांनी भाजपचा आणि या दौऱ्याचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले. तसेच, जर वाटत असेल तर राज ठाकरेंनी भाजपच्या शिर्ष नेतृत्वाची म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागावी, असेही बृजभूषण सिंह यांनी म्हटले आहे.
मुंबई भाजपातूनही विरोध
राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूर यांची माफी मागावी, अशी मागणी मुंबई भाजपचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी केली आहे. 'मी इथूनच विरोध करत आहे. मला अयोध्येला जाण्याची गरज नाही. तिथे मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित आहेत, त्यांचा राज यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध आहे,' असं ठाकूर म्हणाले. मी घटनात्मक पद्धतीनं विचार मांडत आहे. दृष्कृत्याला दृष्कृत्य करून विरोध करण्याची गरज नाही. मात्र आम्ही राज यांच्यावर निश्चितपणे दबाव आणू शकतो. राज यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी स्वच्छ चारित्र्य घेऊन देशासमोर जायला हवं. त्यामुळे तुमचं हे पाऊल केवळ राजकारणासाठी नसल्याचं स्पष्ट होईल, असं ठाकूर यांनी म्हटलं.