राजन हे देशभक्तच; त्यांचे कामही चांगले

By Admin | Published: June 28, 2016 05:35 AM2016-06-28T05:35:34+5:302016-06-28T05:35:34+5:30

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांची देशभक्ती इतर कोणाहूनही कमी नाही.

Rajan is patriot; Their work is also good | राजन हे देशभक्तच; त्यांचे कामही चांगले

राजन हे देशभक्तच; त्यांचे कामही चांगले

googlenewsNext

हरीश गुप्ता,

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांची देशभक्ती इतर कोणाहूनही कमी नाही. ते देशभक्त आहेत व त्यांनी प्रशंसनीय काम केले आहे. भारतावर त्यांचे प्रेम आहे आणि ते कुठेही गेले तरी यापुढेही भारताच्या हितासाठीच काम करीत राहतील, असे स्पष्टपणे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासह स्वपक्षातील इतरही वाचाळवीरांना गप्प केले.
डॉ. राजन यांची नेमणूक आधीच्या सरकारने केली असली तरी त्यांना पूर्ण मुदत संपेपर्यंत काम करू दिले जाईल, असे सांगून पंतप्रधानांनी राजन यांच्या मुदतीआधीच गच्छंती होण्याच्या तर्कवितर्कांनाही पूर्णविराम दिला.
डॉ. स्वामी यांनी आधी डॉ. राजन व नंतर वित्तमंत्री अरुण जेटली आणि वित्त मंत्रालयातील अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांवर तोंड सोडले होते. यावर सुमारे दोन आठवडे बाळगलेले मौन मोदी यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सोडले. स्वामी यांचे थेट नाव न घेता मोदी यांनी त्यांची वक्तव्ये अनुचित असल्याचे स्पष्ट करत पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, असेही नि:संदिग्धपणे जाहीर केले.
स्वामींच्या निमित्ताने पंतप्रधानांनी स्वपक्षातील इतर वाचाळवीरांनाही फटकारले. असे वागणे सहन केले जाणार नाही, असे ते म्हणाले. संरक्षण राज्यमंत्री व्ही. के. सिंग, महिला व बाल कल्याण मंत्री मनेका गांधी, गिरिराज सिंग आणि बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या अन्य मंत्र्यांनाही हा इशाराच असल्याचे मानले जात आहे.
>प्रसिद्धीचा हव्यास कधीही राष्ट्राचे भले करणार नाही
आमचा पक्ष असो वा दुसरा एखादा पक्ष असो, या गोष्टी योग्य नाहीत, असे मला वाटते. सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांनी जबाबदारीने वागले पाहिजे आणि प्रसिद्धीचा हव्यास कधीही राष्ट्राचे भले करू शकणार नाही. कुणी स्वत:ला व्यवस्थेपेक्षा श्रेष्ठ समजत असेल तर ती त्याची मोठी चूक ठरेल.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
अरुण जेटली परतताच स्वामींना समज
स्वामींनी जेटलींच्या पोषाखावरही भाष्य केले होते. जेटली हे सुटाबुटात वेटरसारखे दिसतात, असे ते म्हणाले होते. जेटली हे चीन दौऱ्यावर असल्याने त्यांनी स्वामींच्या या टीकेला उत्तर दिले नाही. आपला चीन दौरा एक दिवसाने कमी करून ते रविवारी रात्री मायदेशी परतले. स्वामींच्या टीकेमुळे अस्वस्थ झालेल्या जेटली यांनी आल्याआल्या पंतप्रधान मोदींची भेट घेतली. या भेटीनंतर पंतप्रधानांनी डॉ. स्वामी यांना ‘समजावल्या’चे कळते.
>मंत्रिमंडळ बदलासाठी बैठक
मोदी, जेटली आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांची आज मंगळवारी बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलावर चर्चा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
>पाकिस्तानच अडचणीत
मी स्वत: लाहोरला दिलेली भेट किंवा
पाकिस्तानच्या पंतप्रधानांना भारत भेटीचे दिलेले निमंत्रण यासारख्या सरकारच्या सततच्या प्रयत्नानंतर दहशतवादाविषयी आपली भूमिका जगाला पटवून देण्याची भारताला गरज राहिलेली नाही.
याबाबतीत जग एकमुखाने भारताची प्रशंसा करीत आहे व त्याला उत्तर देणे पाकिस्तानलाच कठीण जात आहे, असेही मोदी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.
आम्हाला पाकिस्तानशी शांतताच हवी आहे, पण वेळ येईल तेव्हा (गरजेनुसार) प्रत्युत्तर देण्याचे आपल्या सैन्यास पूर्ण स्वातंत्र्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Rajan is patriot; Their work is also good

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.