भारतात परतण्याची छोटा राजनची इच्छा
By admin | Published: October 29, 2015 04:26 PM2015-10-29T16:26:07+5:302015-10-29T16:26:07+5:30
इंडोनेशियन पोलीसांच्या ताब्यात असलेल्या छोटा राजनने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जवळपास दोन दशके भारतातून फरार असलेल्या राजनची अटक
Next
>ऑनलाइन लोकमत
बाली, दि. २९ - इंडोनेशियन पोलीसांच्या ताब्यात असलेल्या छोटा राजनने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जवळपास दोन दशके भारतातून फरार असलेल्या राजनची अटक ही शरणागती आहे, भारतीय अधिका-यांशी केलेले संगनमत आहे की निव्वळ नशीबानं घडलेला योगायोग आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. मात्र, गुरुवारी भारतीय प्रसारमाध्यमांशी दोन तीन वाक्य बोललेल्या राजनने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त करताना, आपण शरण आलेलो नसून आपल्याला अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.
राजनवर भारतात जवळपास ७५ गुन्ह्यांची नोंद असून यामध्ये खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि दाऊद इब्राहीमच्या टोळीतल्या अनेकांची हत्या केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.
दोन दशकांपूर्वीच्या भारताच्या रेड कॉर्नर नोटिशीच्या आधारे व ऑस्ट्रेलियाच्या अधिका-यांनी दिलेल्या टीपमुळे इंडोनेशियाच्या पोलीसांनी राजनला बाली येथे रविवारी अटक केली आहे आणि त्याचे लवकरच भारताकडे प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. राजनच्या विरोधात टाडा, पोटा आणि मकोका या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
राजनला भारतात परत आणण्याची पूर्ण तयारी भारतीय सुरक्षा यंत्रणा करत असून दाऊद इब्राहिमकडून त्याला असलेला धोका लक्षात घेता याबाबत अत्यंत गुप्तता पाळण्यात येत आहे.