खापचे तुघलकी फर्मान, पक्ष्याचं अंडं फोडलं म्हणून चिमुरडीला दिली 'ही' शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 12:08 PM2018-07-13T12:08:51+5:302018-07-13T12:12:15+5:30
राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील हरिपूरा गावामध्ये एक संतापजनक घटना
जयपूर - राजस्थानच्या बुंदी जिल्ह्यातील हरिपूरा गावामध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. गावातील एका पाच वर्षाच्या चिमुकलीने पक्ष्याचं अंडं फोडलं म्हणून चिमुरडीला खाप पंचायतीने घरात प्रवेश करू न दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच या निरागस मुलीला तब्बल 11 दिवस घराच्या बाहेर राहण्याची शिक्षा देण्यात आली. तसेच कोणी तिच्याशी बोलले अथवा तिला जेवण देण्याचा प्रयत्न जरी केला तर मुलीच्या शिक्षेत वाढ केली जाईल असा फतवाही खापने काढला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिपुरा येथील एका प्राथमिक शाळेत ही चिमुरडी शिक्षण घेत आहे. शाळेत एक दिवस मुलीला पक्षाचं एक अंडं दिसलं तिने केवळ उत्सुकता म्हणून त्या अंड्याला हात लावला. मात्र या दरम्यान तिच्याकडून चुकून ते अंडं फुटलं. अंडं फुटल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली. गावातील खाप पंचायतीपर्यंतही ही गोष्ट पोहोचली. त्यानंतर गावातील सर्व मंडळी ही मुलीच्या घराबाहेर गोळा झाली.
अंडं फुटणे ही बाब गावासाठी अत्यंत अशुभ असल्याचं सांगत गावातील मंडळींनी मुलीच्या कुटुंबीयांना धारेवर धरलं. तसेच मुलीला ११ दिवसांसाठी घराबाहेर ठेवण्याची शिक्षा पंचांनी जाहीर केली. मुलीच्या वडिलांनी याला विरोध केला असता, संपूर्ण कुटुंबालाच घराबाहेर हाकलून देण्याची धमकी पंचांनी दिली. मात्र मुलीच्या वडिलांना हिंमत करून 12 जुलैला पोलिसांत तक्रार दाखल केली आणि हा संपूर्ण प्रकार उघड झाला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.