अंत्यविधी सुरू असताना 95 वर्षांच्या आजोबांना जाग येते तेव्हा...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 04:34 PM2018-11-06T16:34:04+5:302018-11-06T16:34:35+5:30
राजस्थानातील जयपूरमध्ये एक अचंबित करणारी घटना घडली आहे. खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी ही आनंद द्विगुणित करणारी घटना आहे.
जयपूर- राजस्थानातील जयपूरमध्ये एक अचंबित करणारी घटना घडली आहे. खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी ही आनंद द्विगुणित करणारी घटना आहे. गुर्जर कुटुंबातील 95 वर्षांच्या आजोबांना मृत घोषित करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. अंत्यसंस्काराचे विधी सुरू असतानाच निपचित पडलेले आजोबा अचानक उठून बसले आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
खेत्री तालुक्यातील गुर्जर कुटुंबीयांसाठी हा आनंदाचा क्षण होता. गुर्जर कुटुंबातील आजोबा बुद्धराम शनिवारी दुपारी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. आजोबांचं निधन झाल्याची बातमी समजल्यानंतर कुटुंबीयांनीही अंत्यसंस्काराची तयारी केली. अंत्यविधी सुरू केल्यानंतर सदस्यातील पुरुष मंडळींनी मुंडनही करून घेतले. त्यानंतर बुद्धराम आजोबांना नखनिखान्त आंघोळ घालण्यात आली. आंघोळीचं पाणी अंगावर पडल्यानंतर आजोबांच्या शरीरातून काहीशी हालचाल जाणवली. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना पलंगावर नेऊन झोपवलं आणि थोड्याच वेळात ते उठून बसले.
नातेवाईकांनी त्यांची आस्थेवाइकपणे चौकशी केली असता, छातीत दुखू लागल्यानं झोपलो होतो, असं त्यांनी उत्तर दिलं. वडील पुन्हा जिवंत झाल्यानं मुलगा बाळू राम याचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. यंदाची दिवाळी आमच्यासाठी खास आहे. वडिलांच्या निधनामुळे आम्ही दिवाळी साजरी करू शकत नव्हतो. परंतु आता वडिलांबरोबरच दिवाळी साजरी करू, असे धाकटा मुलगा म्हणाला आहे.