असहिष्णुतेचा कळस! जखमींना मदत करण्याऐवजी लोक सेल्फीत मग्न, हकनाक गेला तिघांचा जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 03:58 PM2018-07-11T15:58:10+5:302018-07-11T16:06:11+5:30
गेल्या काही दिवसांपासून लोकांमधली संवेदनहीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
जयपूर- गेल्या काही दिवसांपासून लोकांमधली संवेदनहीनता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. ब-याचदा अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करायची सोडून लोक त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. राजस्थानतल्या बाडमेर जिल्ह्यातही असाच एक किळसवाणा प्रकार उजेडात आला आहे. बाडमेर जिल्ह्यात रस्त्यावर एका स्कूल बसनं बाइकस्वारांना उडवलं.
त्या अपघातग्रस्त बाइकस्वारांना मदत करायची सोडून काही विघ्नसंतोषी माणसं त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यात दंग झाली. वेळीच त्या जखमींवर उपचार न झाल्यानं तिघांनाही जिवाला मुकावं लागलं आहे. मंगळवारी बाडमेर जिल्ह्यात रस्त्यावर बाइक आणि स्कूलबसचा अपघात झाला. या अपघातात बाइकवरील तिघे गंभीररीत्या जखमी झाले.
त्याच वेळी जखमींना मदत करायची सोडून लोकांनी सेल्फी आणि व्हिडीओ घेण्यात धन्यता मानली. कोणालाही त्यांना मदत करावीशी वाटली नाही. अपघातग्रस्त तरुण हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. तरीही त्यांना मदत करण्याऐवजी लोक त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यात व्यस्त होते. तिन्ही जखमींना वेळीच उपचार न मिळाल्यानं त्यांचा हकनाक जीव गेला. अपघातग्रस्त व्यक्ती मदतीसाठी बघ्यांकडे याचना करत होते. परंतु तरीही त्यांच्या हृदयाला काही पाझर फुटला नाही. त्यांनी शेवटपर्यंत त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यात धन्यता मानली.
परमानंद, चंदा राम आणि गेमा राम यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. ते सर्व गुजरातमध्ये कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत होते. दोन दिवसांपूर्वीच मजुरांच्या शोधात ते बाडमेरमध्ये आले होते. विशेष म्हणजे यापूर्वीसुद्धा देशात अशा ब-याचशा घटना घडल्या आहेत. जेथे जखमींना मदत करायची सोडून लोक त्यांच्याबरोबर सेल्फी घेण्यात धन्यता मानली आहे.