शेतकऱ्याच्या पाच मुली अन् पाचही झाल्या RAS अधिकारी, इयत्ता ५ वी नंतर घरीच केला अभ्यास
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 01:17 PM2021-07-15T13:17:46+5:302021-07-15T13:18:30+5:30
राजस्थानच्या हनुमानगड येथील भैरुसरी नावाच्या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
राजस्थानच्या हनुमानगड येथील भैरुसरी नावाच्या छोट्याशा गावात एका शेतकऱ्याच्या पाच मुलींनी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. सहदेव सहारण नावाच्या शेतकऱ्याच्या तीन मुलींची नुकतीच राजस्थान प्रशासन सेवेत (RAS) निवड झाली आहे. विशेष म्हणजे या तिनही मुली इयत्ता पाचवीनंतर कधीच शाळेत गेल्या नाहीत. त्यांनी राहत्या घरातूनची शिक्षण पूर्ण केलं आहे. कारण वडिलांच्या शेतीतून अत्यल्प उत्पन्न मिळत होतं. त्यामुळे शाळे पाठविण्यासाठी देखील पैसे सहदेव यांच्याकडे नसायचे. पण त्यांच्या मुलींनी एकमेकींना साथ देत स्वत:च्या हिमतीवर शिक्षण पूर्ण केलं आहे.
सहदेव सहारण यांना एकूण पाच मुली आहेत आणि सध्याच्या घडीला पाचही मुली सरकारी सेवेत कार्यरत आहेत. यातील एक मुलगी झुंझुनूमध्ये बीडीओ पदावर सरकारी सेवेत कार्यरत आहे. तर आता तीन मुलींची आरएएसमध्ये निवड झाली आहे. मुलीला डोक्यावरचं ओझं मानणाऱ्यांसाठी सहदेव यांच्या पाचही मुली आज प्रेरणास्थान ठरत आहेत. मुलींना केव्हाच शिक्षण घेण्यापासून रोखलं नाही, असं सहदेव सांगतात. आरएएसचा निकाल जाहीर झाला आणि तिन्ही बहिणींची निवड झाल्याचं समजल्यानंतर सहारण यांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण झालं. संपूर्ण गावात सहदेव यांच्या मुलींचं कौतुक केलं जात आहे.
राजस्थान प्रशासकीय सेवा २०१८ (RAS) चे निकाल जाहीर झाले आहेत. यात सहदेव यांच्या अंशु, रितू आणि सुमन या तिनही मुलींची निवड झाली आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांची मुलाखत प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा अंतिम निकाल जाहीर करण्यात आले. यात सहदेव यांच्या तिनही मुलींनी यश प्राप्त केलं आहे.
सहदेव यांच्या मुलींचं आयएफएस अधिकारी प्रवीण कासवान यांनीही कौतुक केलं आहे. "शेतकरी सहदेव सहारण यांच्या पाचही मुली आता आरएएस अधिकारी आहे. काल रितू, अंशु आणि सुमन यांची निवड झाली. तर दोन मुली याआधीपासूनच सरकारी सेवेत आहेत. सहारण कुटुंब आणि संपूर्ण गावासाठी ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे", असं ट्विट प्रवीण कासवान यांनी केलं आहे.