Rajasthan Assembly Elections 2018: JNUमधील कंडोम मोजणाऱ्या भाजपा आमदाराचा पत्ता कट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 11:13 AM2018-11-15T11:13:15+5:302018-11-15T11:14:39+5:30
जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमध्ये रोज 3 हजार कंडोम मिळत असल्याचा दावा केला होता.
नवी दिल्ली: राजस्थानमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी सुरु आहे. या निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या 31 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भाजपाने 15 आमदार आणि 3 मंत्र्यांचा पत्ता कट केला असून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. भाजपाने ज्या आमदारांचा आणि मंत्र्यांच्या पत्ता कट केला आहे, त्यामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारे ज्ञानदेव आहुजा, धनसिंह रावत आणि राजकुमार रिणवा यांच्यासह अन्य काही नेत्यांचा समावेश आहे.
भाजपा आमदार ज्ञानदेव आहुजा यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी दिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमध्ये रोज 3 हजार कंडोम मिळत असल्याचा दावा केला होता. 2016 साली ज्ञानदेव आहुजा यांनी असे विधान केले होते. जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीमध्ये रोज 50 हजार हडांचे तुकडे, सिगारेटची 10 हजार थोटके, 3 हजार वापरण्यात आलेले कंडोम आणि अबॉर्शन करण्यासाठी वापरण्यात आलेले 500 इंजेक्शन मिळतात, असे त्यांनी म्हटले होते. तसेच, युनिव्हर्सिटीत होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी नेकेड डान्स करत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता.
ज्ञानदेव आहुजा राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील रामगडचे भाजपा आमदार आहेत. ज्ञानदेव आहुजा यांच्याशिवाय धनसिंह रावत आणि राजकुमार रिणवा यांनी सुद्धा वादग्रस्त विधाने केली होती. तसेच, किशनाराम नाई, लक्ष्मीनारायण बैरवा, आरसी सुनेरीवाल, जीतमल खांट, रानी कोली, शैतान सिंह, तरुण राय कागा, छोटू सिंह भाटी, कृष्ण कडवा, गीता वर्मा, राजकुमारी जाटव, मंगला राम, रानी सिलोटिया, शिमला बावरी या आमदारांना भाजपाने आगामी विधानसभा निवडणुकीत डच्चू दिला आहे.
राजस्थानात दर पाच वर्षांनी सत्ताबदल !
गेल्या 25 वर्षांत राजस्थानच्या जनतेने सतत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात कौल दिला आहे. 1993 मध्ये भैरोसिंह शेखावत, 1998 मध्ये अशोक गेहेलोत, 2003 मध्ये वसुंधरा राजे, 2008 पुन्हा अशोक गेहेलोत आणि 2013 साली पुन्हा वसुंधराराजे असा सत्ताबदल झाला. यंदा निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून सरकारविरोधी सूर दिसत आहे. त्यामुळे 180 जागा निवडून आणण्याचा दावा करणा-या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासमोर पुन्हा सत्ता राखण्याचे आव्हान आहे.