विजय मिळवल्यानंतर राजस्थानमध्ये भाजप आमदार ॲक्शनमोडमध्ये! मांसाहरी स्टॉल होणार बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2023 03:07 PM2023-12-04T15:07:34+5:302023-12-04T15:08:10+5:30
राजस्थानमध्ये काल भाजपने विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवला.
राजस्थान विधानसभा निवडणुकीत भाजपने काल मोठ्या फरकाने विजय मिळवला. भाजपने ११५ जागांवर विजय मिळवला तर काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या. यामुळे राजस्थानमध्ये भाजपचा सत्तास्थानेचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, भाजपचे आमदार ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. भाजपच्या एका आमदाराने अधिकाऱ्याला फोन करून संध्याकाळपर्यंत रस्त्यावरील सर्व मांसाहारी पदार्थांचे स्टॉल हटवण्याचा इशारा दिला आहे.
हवामहलचे भाजप आमदार बालमुकुंद आचार्य यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला फोन करून रस्त्यावर मांसाहार करू नये, असा इशारा दिला. सायंकाळपर्यंत सर्व रस्ते मोकळे करावेत. मांसाहाराची विक्री करणाऱ्या अशा सर्व गाड्या हटवण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यांनी रोडवरच अधिकाऱ्यांना फोन केला आणि म्हणाले, 'आम्ही रस्त्यावर खुलेआम मांसाहार करू शकतो का? होय किंवा नाही म्हणा. त्यामुळे तुम्ही याला समर्थन देत आहात, तात्काळ रस्त्यावर उभ्या असलेल्या आणि बांधल्या जात असलेल्या सर्व मांसाहारी गाड्या दिसू नयेत. मी तुमच्याकडून संध्याकाळी अहवाल घेईन,'असंही ते फोनवर म्हणाले.
बालमुकुंद आचार्य यांनी ६०० मतांनी निवडणूक जिंकली आहे. रविवारी आलेल्या निवडणूक निकालात बालमुकुंद आचार्य यांनी राजधानी जयपूरच्या हवामहल विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर ६०० मतांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांनी काँग्रेसचे आरआर तिवारी यांचा पराभव केला आहे.
दरम्यान,बालमुकुंद आचार्य यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी यावर जोरदार प्रहार केला आहे. हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. ते कोणीही रोखू शकत नाही. एखाद्याला नॉनव्हेज खाण्याचा स्टॉल लावायचा असेल तर त्याला कोणी रोखणार कसे?, असा सवालही त्यांनी केला.