हनुमान जगातील पहिला आदिवासी नेता- भाजप आमदार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2018 10:58 AM2018-05-28T10:58:28+5:302018-05-28T11:01:43+5:30
जगभरात हनुमानाची सर्वाधिक मंदिरं असल्याचा दावा
जयपूर: जवाहरलाल नेहरु विद्यापीठात दररोज 3 हजार कंडोम सापडतात, असं वादग्रस्त विधान करणारे भाजपा आमदार ज्ञानदेव अहुजा आता नव्या विधानामुळे चर्चेत आले आहेत. हनुमान जगातील पहिले आदिवासी नेता होता, असं वक्तव्य अहुजा यांनी केलंय. हनुमानाचा अपमान करणाऱ्या घटनेचा संदर्भ देऊन अहुजा बोलत होते. 'हनुमान यांनी पहिले आदिवासी नेते म्हणून पृथ्वीवर जन्म घेतला. त्यामुळेच जगभरात मोठ्या प्रमाणात हनुमानाची मंदिरं पाहायला मिळतात. त्यामुळे आपण हनुमानाचा अपमान करु नये,' असं अहुजा यांनी म्हटलं.
'हनुमानजी जगातील पहिला आदिवासी नेता होता. आदिवासी समाजातील पहिले संत म्हणूनदेखील हनुमान यांचं नाव घेता येईल. भगवान राम चित्रकूटाच्या दिशेनं जात असताना हनुमानजींनी आदिवासींचं सैन्य तयार केलं. या सैन्याला भगवान रामानं प्रशिक्षण दिलं होतं,' असं अहुजा म्हणाले. ज्ञानदेव अहुजा रामगढ विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. जगभरात हनुमानाची 40 लाख मंदिरं असल्याचा दावादेखील त्यांनी केला.
याआधी ज्ञानदेव अहुजा जेएनयूमधील विद्यार्थ्यांबद्दल केलेल्या विधानांमुळे चर्चेत आले होते. जेएनयू म्हणजे सेक्स आणि ड्रग्जचा अड्डा असल्याचं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं. जेएनयूमध्ये दररोज 3 हजार कोटी कंडोम आणि 2 हजार दारुच्या बाटल्या सापडतात. याठिकाणी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा गैरकृत्यांमध्ये सहभाग असतो, असं अहुजा यांनी म्हटलं होतं.