कौतुकास्पद! दिवसा अभ्यास अन् रात्री हॉटेलमध्ये काम; गौरवने दहावीत मिळवले ९७ टक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:33 AM2024-05-30T11:33:34+5:302024-05-30T11:39:22+5:30
गौरव कुमावत याने मेहनतीने ९७% गुण मिळवून आई-वडील आणि शिक्षकांची मान अभिमानाने उंचावली आहे.
तुमच्या मनात प्रबळ इच्छा असेल तर तुम्ही तुमचं ध्येय निश्चितपणे गाठू शकता. अशीच एक प्रेरणादायी घटना समोर आली आहे. राजस्थानच्या पुष्कर येथील गौरवने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केलं आहे. गौरव त्याच्या वडिलांसोबत हॉटेलमध्ये काम करायचा आणि वेळ काढून अभ्यास करायचा. राजस्थान बोर्डाच्या 10वीच्या परीक्षेत ९७% गुण मिळवून त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
केशव नगरमध्ये राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील गौरव कुमावत याने मेहनतीने ९७% गुण मिळवून आई-वडील आणि शिक्षकांची मान अभिमानाने उंचावली आहे. गौरव सांगतो की त्याचे वडील रमेश कुमावत पुष्करमध्ये हॉटेल चालवतात. अशा परिस्थितीत शाळेतून परतल्यावर घरातील काम उरकून तो रोज हॉटेल गाठायचा आणि वडिलांना कामात मदत करायचा.
सकाळी 5:00 ते 7:00 आणि रात्री 11:00 ते 1:00 पर्यंत ते सेल्फ स्टडी करायचा. दिवसभरात जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा गौरव त्याची पुस्तकं उघडून उजळणी करून अभ्यास करू लागला. आपल्या यशाचे श्रेय त्याने आई-वडील आणि शिक्षकांना दिलं आहे. गौरव पुष्करच्या प्रवीण शिक्षा निकेतन शाळेत शिकत होता.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही बोर्डाच्या निकालात आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. अजित नाथ आणि बीना बकोलिया यांनी ९८ टक्के गुण मिळवून आपल्या कुटुंबाचा गौरव केला आहे. दोन्ही विद्यार्थी गरीब कुटुंबातून आलेले असले तरी अभ्यासात आघाडीवर आहेत. त्यांना भविष्यात काहीतरी बनून आपल्या कुटुंबाची स्थिती सुधारायची आहे, त्यामुळे परिस्थिती कशीही असली तरी ते अभ्यासाशी तडजोड करत नाहीत. अजितचे वडील पप्पूनाथ हे शिंपी म्हणून काम करतात. प्रशासकीय सेवेत जाण्याचं त्याचं स्वप्न आहे.