Anjali Kanwar Marriage: बापच तो! मुलीने भर मंडपात 'हुंडा' मागितला; त्याने ब्लँक चेक सही करून हातात ठेवला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 02:16 PM2021-11-27T14:16:02+5:302021-11-27T14:17:08+5:30
Anjali Kanwar gave dowry to build Women Hostel: अंजली कंवर या तरुणीचे लग्न होते. तिने आपल्या वडिलांच्या हातात एक पत्र ठेवले. त्यामध्ये जे लिहिले होते, ते ऐकूण उपस्थित वरातींनाही टाळ्या वाजवाव्या लागल्या.
राजस्थानच्या बाडमेरमध्ये एका लग्न समारंभात अनोखा प्रकार घडला आहे. जेव्हा वरात आली तेव्हा लग्नाचे सर्व विधी पार पडले. परंतू नंतर असे काही घडले की ज्याची कोणीच कल्पना केली नसेल. निरोप देताना नवरीने असे काम केले की ती अनेकांसाठी एक आदर्श बनली आहे.
अंजली कंवर या तरुणीचे लग्न होते. तिने आपल्या वडिलांच्या हातात एक पत्र ठेवले. त्यामध्ये जे लिहिले होते, ते ऐकूण उपस्थित वरातींनाही टाळ्या वाजवाव्या लागल्या. अंजलीने तिच्या बापाकडे हुंडा मागितला होता. तुम्ही म्हणाल यात टाळ्या वाजवण्यासारखे किंवा आदर्श घेण्यासारखे काय आहे, हुंडा मागितला म्हणजे गुन्हाच केला. पण तो कशासाठी मागितला हे कारण वाचाल तर तुम्हीही तिच्यासाठी टाळ्या वाजवाल.
अंजलीने म्हटले की बापाने लग्नात दिलेला हुंडा तिला तिच्यासोबत सासरी न्यायचा नाहीय. त्या ऐवजी मुलींच्या हॉस्टेलचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करायचे आहे. लाडक्या मुलीची इच्छा पाहून बापाने लगेचच चेकबुक मागविले. किशोर सिंह कानोड यांनी मुलीच्या हातात ब्लँक चेक सही करून दिला व म्हणाले तुम्हा भरायची तेवढी रक्कम भर. अंजलीने गर्ल्स हॉस्टेल बनविण्यासाठी 75 लाख रुपये घेतले.
यावर अंजलीने सांगितले की, ती ज्या समाजातून येते तिथे मुलींच्या शिक्षणाबाबत लोकांचे विचार अद्याप बदललेले नाहीत. अंजली देखील जेव्हा शिक्षणासाठी गेली होती, तेव्हा तिच्या वडिलांना लोकांचे खूप ऐकावे लागले होते. यामुळे तिला जसे शिक्षण मिळाले तसेच समाजाच्या इतर मुलींना मिळावे म्हणून तिने हे पैसे घेतले. अंजलीच्या वडिलांनी राजपूत हॉस्टेल परिसात मुलींसाठी हॉस्टेल बांधण्याच्या कामासाठी आधीच एक कोटी रुपये दिले आहेत. आता आणखी 75 लाख रुपये देऊन अर्धवट राहिलेले काम अंजली पूर्ण करणार आहे.
अंजलीच्या सासरच्यांनी आमच्या घरी लक्ष्मी आल्याने आम्ही नशीबवान समजतो. आमच्या समाजाचे लोक लग्नसमारंभांवर लाखो, करोडो रुपये उधळतात. त्याचा योग्य वापर केला जाऊ शकतो, असे म्हटले आहे.