दुधाची रिकामी पाकिटे आणा, पेट्रोल-डिझेलवर डिस्काउंट मिळवा! पेट्रोल पम्प चालकाची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 04:01 PM2022-08-08T16:01:49+5:302022-08-08T16:01:58+5:30
मुंदडा यांनी 15 जुलैपासून तीन महिन्यांचे जन जागृती अभियान सुरू केले आहे.
राजस्थानातील भीलवाडीमध्ये एका पेट्रोल पम्प चालकाने सिंगल यूज प्लास्टिकसंदर्भात जन जागृती निर्माण करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. दूधाची रिकामी पाकिटे आणि प्लास्टिकच्या बाटल्यांच्या बदल्यात एक लीटर पेट्रोलवर एक रुपया, तर एक लीटर डिझेलवर 50 पैशांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. चित्तौडगढ रोडवर असलेल्या छगनलाल बागतावरमल पेट्रोल पम्पचे मालक अशोक कुमार मुंदडा हे या मोहिमेंतर्गत लोकांना सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.
मुंदडा यांनी 15 जुलैपासून तीन महिन्यांचे जन जागृती अभियान सुरू केले आहे. राज्यातील डेअरी ब्रँड सरस डेअरी, भिलवाडा जिल्हा प्रशासन तथा प्रदूषण नियंत्रण बोर्डानेही त्यांच्या या मोहिमेचे समर्थन केले आहे. सरस डेअरीने पेट्रोप पम्पावर जमा करण्यात आलेली रिकामी पाकिटांची विल्हेवाट लावण्याचा संकल्प केला आहे.
भिलवाडाचे जिल्हाधिकारी आशीष मोदी यांनी म्हटले आहे, की 'पेट्रोल पम्प मालक सिंगल यूज प्लास्टिकविरोधात जनजागृती निर्माण करण्याचा प्रस्ताव घेऊन आले होते. त्यांनी सरस डेअरी दूधाची रिकामी पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या आणल्यानंतर पेट्रोलवर सूट देणार असल्याचे म्हटले आहे. जागृती अभियान सुरू झाले आहे.'
यासंदर्भात बोलताना मुंदडा म्हणाले, दुधाची एकूण 700 पाकिटे जमा झाली आहेत. 'जर एखाद्या व्यक्तीने दुधाचे एक लीटरचे रिकामे पाकिट अथवा अर्धा लिटरची दोन रिकामी पाकिटे आणली किंवा पाण्याची एक लिटरची बाटली आणली तर, त्याला पेट्रोलवर एक रुपया प्रतिलिटर आणि डिझेलवर 50 पैसे प्रती लिटरची सूट देत आहोत. ही पाकिटे पेट्रोल पंपावर एकत्र केली जातात आणि नष्ट करण्यासाठी सरस डेअरीकडे पाठवली जातात. मात्र, अपेक्षेप्रमाणे पाकिटे आली नाहीत, असेही मुंदडा यांनी म्हटले आहे.
याच बरोबर, पावसाळ्यामुळे सध्या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. यामुळे आता आम्ही या अभियानाची मुदत सहा महिन्यांपर्यंत वाढविण्याचा विचार करत आहोत, असेही मुंदडा यांनी म्हटले आहे.