राजस्थानचं मंत्रिमंडळ 'हुश्शार'... या १२ जणांचं शिक्षण पाहून चकित व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 12:02 PM2018-12-26T12:02:09+5:302018-12-26T12:03:33+5:30
राजस्थान सरकारमध्येही उच्चशिक्षित मंत्र्यांची कमतरता नाही. तेलंगणाप्रमाणेच येथील विधानसभेतही पीएचडी पदवीधारक, वकिल अन् इंजिनिअर आमदारांचा समावेश आहे.
जयपूर - राजस्थान सरकारच्या मंत्रिमंडळाचा सोमवारी शपथविधी सोहळा पार पडला. येथील अशोक गेहलोत सरकारच्या मंत्रिमंडळात 10 वी पास ते पीएचडी प्राप्त आमदारांचा भरणा आहे. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात अर्धा डझन वकिलांचा समावेश आहे. तर एका बेसबॉलच्या राष्ट्रीय खेळाडूलाही स्थान मिळाले आहे. मात्र, याच मंत्रिमंडळातील 8 मंत्र्यांविरुद्ध पोलिसात गुन्हेही दाखल आहेत.
राजस्थान सरकारमध्येही उच्चशिक्षित मंत्र्यांची कमतरता नाही. तेलंगणाप्रमाणेच येथील विधानसभेतही पीएचडी पदवीधारक, वकिल अन् इंजिनिअर आमदारांचा समावेश आहे. गेहलोत यांच्या 23 आमदारांच्या मंत्रिमंडळातील 8 जणांविरुद्ध पोलिस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. त्यांमध्ये रमेश चंद्र मीना हे एकमेव इंजिनिअर पदवीधारक आहेत. तर गेहलोत यांच्या मंत्रिमंडळात बीडी कल्ला, रघु शर्मा आणि आरएलडी सुभाष गर्ग हे पीएचडी पदवीधारक आहेत. या तीनही आमदारांनी नुकतीच राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. कल्ला आणि रघु शर्मा यांनी एलएलबीचेही शिक्षण पूर्ण केलं आहे. तर शांतीकुमार धारीवाल, गोविंद सिंग दोतासरा, सुखराम बिश्णोई आणि तिकाराम जुली हेही एलएलबी पदवीधारक आहेत. तसेच, रघु शर्मा आणि ममता भुपेश हे दोन एमबीए पदवीधारक मंत्री असून ममता भुपेश एकमेव महिला मंत्री आहेत.
गेहलोत यांच्या मंत्रिमंडळातील पाच मंत्र्यांचे शिक्षण हे बारावी किंवा तत्सम कोर्स पूर्ण केलेले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी स्वत: पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले आहे.