महिलेची विवस्त्र अवस्थेत धिंड काढली; मुख्यमंत्र्यांनी पीडितेची भेट घेऊन जाहीर केली आर्थिक मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2023 04:43 PM2023-09-02T16:43:54+5:302023-09-02T16:44:14+5:30
राजस्थानच्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं.
राजस्थानच्या आदिवासीबहुल प्रतापगड जिल्ह्यातील एका घटनेनं सर्वांच्या डोळ्यात पाणी आणलं. इथे पतीनं पत्नीचे कपडे फाडून तिची विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याची घटना घडली. या घटनेनंतर राजस्थानचेमुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी प्रतापगड गाठून पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी पीडितेला सरकारी नोकरी आणि १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली.
संबंधित पीडितेची भेट घेतल्यानंतर गेहलोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, महिला आता गरोदर असून तिला आर्थिक मदतीची गरज आहे, पीडित आणि कुटुंबीय म्हणतील त्याप्रमाणे आम्ही एफडी करून घेऊ. तसेच पोलिसांनी काही तासांतच सर्व ११ आरोपींना पकडले. गावात नेटवर्क नसतानाही पोलिसांनी चोख काम केले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पोलिसांचे कौतुक केले.
ही हृदयद्रावक घटना उघडकीस आल्यानंतर आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ट्विट करून पोलीस महासंचालकांना एडीजी क्राईमला घटनास्थळी पाठवून याप्रकरणी कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. अशा गुन्हेगारांना सुसंस्कृत समाजात स्थान नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते. आरोपींना तात्काळ तुरुंगात टाकले जाईल, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल आणि शिक्षा होईल, अशी ग्वाही देखील गेहलोत यांनी दिली.
व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई
दरम्यान, पीडित महिलेची विवस्त्र अवस्थेत धिंड काढल्याची व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनेचा व्हिडीओ पाहून पोलीसही चक्रावून गेले. पोलिसांनी लगेचच या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला आणि आरोपी पतीसह सर्व ११ आरोपींना अटक केली.