मनी लाँड्रिंग प्रकरणात वैभव गेहलोत यांची चौकशी, करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 03:24 PM2023-10-30T15:24:43+5:302023-10-30T15:25:32+5:30
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत आज ईडीसमोर हजर झाले.
नवी दिल्ली : राजस्थानमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीची धूमाकूळ सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत आज ईडीसमोर हजर झाले.
वैभव गहलोत यांची फेमा (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट) उल्लंघन आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी करण्यात आली. दिल्लीत ईडीसमोर हजर झाल्यानंतर वैभव गेहलोत म्हणाले की, फेमा प्रकरणात ईडीने मला प्रश्न विचारले आणि मी सांगितले की, आमचा फेमाशी काहीही संबंध नाही. वैभव गेहलोत म्हणाले की, "माझा आणि माझ्या कुटुंबाचा फेमाशी काहीही संबंध नाही. आम्ही कोणताही परदेशी व्यवहार केला नाही."
दरम्यान, राजस्थानमधील पेपर लीक प्रकरणी नुकतेच ईडीने प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंद सिंग दोतासरा यांच्या घरावर छापा टाकला होता. यासोबतच ईडीने फेमा प्रकरणी वैभव गेहलोत यांना समन्स बजावले होते. वैभव गहलोत यांच्या कंपनीवर शेल कंपन्यांच्या माध्यमातून करोडो रुपये मॉरिशसला पाठवल्याचा आरोप आहे. याबाबत भाजप खासदार किरोडीलाल मीणा यांनी ईडीमध्ये तक्रार दाखल केली होती.
#WATCH | Congress leader and son of Rajasthan CM Ashok Gehlot, Vaibhav Gehlot arrives at the office of the Enforcement Directorate in Delhi, to appear before the agency, in connection with a FEMA case pic.twitter.com/8F3UQoXGFj
— ANI (@ANI) October 30, 2023
वैभव गेहलोत यांनी मॉरिशसच्या एका कंपनीच्या माध्यमातून हॉटेलमध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप किरोडीलाल मीणा यांनी केला होता. तसेच, याप्रकरणी वैभव गेहलोत यांना ईडीने समन्स बजावल्यानंतर काँग्रेसने भाजपवर जोरदार हल्ला चढवला. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्व भाजप करत असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना चुकीचे दाखवण्यासाठी हे सर्व केले जात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.