बँक कर्मचाऱ्याच्या वरातीत पोलिसांचा मोठा फौजफाटा; ड्रोनने गावावर पाळत, २० वर्षापूर्वीच्या घटनेनं निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2025 17:49 IST2025-01-22T17:40:11+5:302025-01-22T17:49:24+5:30
राजस्थानमध्ये एका नवरदेवाच्या वरातीदरम्यान मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

बँक कर्मचाऱ्याच्या वरातीत पोलिसांचा मोठा फौजफाटा; ड्रोनने गावावर पाळत, २० वर्षापूर्वीच्या घटनेनं निर्णय
Rajasthan Police:राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यात एका लग्नात आलेला ७५ पोलिसांचा फौजफाट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दलित वराच्या लग्नाच्या मिरवणुकीत कोणताही वाद होऊ नये, यासाठी पोलिसांचा ताफा येथे दाखल झाला होता. अजमेरमध्ये वराच्या लग्नाची मिरवणूक कडेकोट पोलीस बंदोबस्तात पार पडली. लग्नाच्या मिरवणुकींपेक्षा पोलिसांची संख्या जास्त होती. या वरातीमध्ये जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दीपक कुमार देखील सामील झाले होते. २० वर्षांपूर्वी झालेल्या वादामुळे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करून वराने सुरक्षेची मागणी केली होती.
२१ जानेवारी रोजी हे लग्न पार पडलं. लग्नाच्या सुरक्षेसाठी पोलीस अधिकारी संपूर्ण टीमसोबत पोहोचले होते. या वरातीमध्ये उपविभाग अधिकारी देवीलाल यादव, तहसीलदार ममता यादव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ दीपक कुमार, पोलीस उपअधीक्षक जर्नेल सिंग आणि जवळपासच्या अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी उपस्थित होते. मोठ्या बंदोबस्तात पोलिसांची पथके लग्नासाठी दाखल झाली होती. त्यानंतरच अजमेरच्या श्रीनगर गावातून नवरदेव लोकेशची लग्नाच्या वरात लवेरा गावात पोहोचली.
कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात हा विवाहसोहळा कोणत्याही वादविना पार पडला. कोणत्याही अडथळ्याशिवाय लोकेशची घोडीवर लग्नाची वरात काढण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधिक्षक डॉ दीपक कुमार यांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आल्याचे सांगितले.
कोणताही तणाव किंवा वाद होऊ नये म्हणून ड्रोनच्या माध्यमातून संपूर्ण गावावर नजर ठेवण्यात आली होती. सुमारे २० महिला कॉन्स्टेबलही या ठिकाणी तैनात करण्यात आल्या होत्या. लग्नाच्या मिरवणुकीपेक्षा पोलिसांची संख्या जास्त दिसली. कडेकोट बंदोबस्तात लोकेश रेगर याच्या लग्नाची वरात दुपारी अडीचच्या सुमारास लग्नस्थळी पोहोचली.
लवेरा गावातल्या वधूच्या वडिलांनी नवरदेव घोडीवर आल्यावर वाद होण्याची भीती व्यक्त केली होती. मुलगी अरुणा हिचे लग्न श्रीनगर गावातील लोकेशसोबत ठरलं होतं. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. त्यासाठी त्यांनी पोलीस आणि प्रशासनाकडे अर्जही दिला होता. 'माझ्या समाजात भीती होती आणि त्यामुळे आम्ही पोलिसांकडे संरक्षण मागितले होते. माझ्या बहिणीच्या लग्नातही २० वर्षांपूर्वी वाद झाला होता, असं मुलीचे वडील नारायण यांनी सांगितले.
२० वर्षांपूर्वी काय घडलं?
जुलै २००५ मध्ये, नारायण यांची बहीण सुनीता हिच्या लग्नात, वरच्या जातीतील लोकांनी घोड्यावरून वरात काढण्यास विरोध केला होता. त्यावेळीही पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून बंदोबस्त ठेवला होता. मात्र असे असतानाही विशेष वर्गाच्या दबावाखाली घोडी मालक घोडीसह विवाह सोहळ्यातून गायब झाला होता. त्यामुळे पोलिसांच्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली होती.