बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू; ५६ तासांनी बाहेर काढल्यानंतर थांबला होता श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2024 08:21 AM2024-12-12T08:21:58+5:302024-12-12T08:22:16+5:30
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी बोअरवेलमध्ये पडलेल्या आर्यनला वाचवण्यात यश आलेले नाही.
Dausa Borewell Rescue : राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील कालीखड गावात बोलवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला बाहेर काढण्याचे काम बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दौसा जिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक शर्मा यांनी सांगितले की, दोनदा ईसीजी केल्यानंतर मुलाला मृत घोषित करण्यात आले आहे. तब्बल ५६ तासांनंतर चिमुकल्याला बाहेर काढण्यात यश आले मात्र त्याला वाचवता आले नाही. मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे.
राजस्थानच्या दौसा जिल्ह्यात ३ दिवसांपासून बोअरवेलमध्ये अडकलेल्या ५ वर्षाच्या निष्पाप आर्यनचा मृत्यू झाला आहे. सुमारे ५६ तासांनंतर आर्यनला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. त्याला अत्याधुनिक लाइफ सपोर्ट सिस्टीमने सुसज्ज रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. पहिलX पायलिंग मशीन बिघडल्यानंतर एनडीआरएफच्या टीमने दुसऱ्या मशीनच्या सहाय्याने बोअरवेलजवळ खड्डा खोदून आर्यनला सुमारे १५० फूट खोल बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आलं होतं.
एनडीआरएफच्या टीमने आर्यनला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले होते. "मुलाला इथे रुग्णालयात आणण्यात आले जेणेकरून त्याच्या जगण्याची काही शक्यता असल्यास आम्ही त्याच्यावर पुढील उपचार करू शकू. पण जेव्हा आम्ही ईसीजी केला तेव्हा त्याच्यात जीव उरला नव्हता. आम्ही दोनदा ईसीजी केला. त्यानंतर आम्ही मुलाला मृत घोषित केले," असं डॉ. दीपक शर्मा यांनी सांगितले
सोमवारी दुपारपासून कालिखड गावात बचावकार्य सुरू होते. सोमवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आर्यन त्याच्या आईसमोरच बोअरवेलमध्ये पडला होता. घरापासून १०० फूट अंतरावर ही घटना घडली. त्यानंतर आर्यनला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु झाले होते. सोमवारी रात्री २ वाजल्यानंतर आर्यनची कोणतीही हालचाल दिसत नव्हती. एनडीआरएफ, एसडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स आणि बोअरवेलशी संबंधित स्थानिक तंत्रज्ञानाच्या तज्ज्ञांच्या टीमने त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले होते. बोअरवेलजवळ पायलिंग मशीनच्या सहाय्याने सुमारे १२५ फूट खोल खड्डा खणण्यात आला होता. परंतु नंतर मशीनमध्ये बिघाड झाला आणि बचावकार्य तीन-चार तास थांबले.
बोअरवेलच्या आतील माती आर्यनच्या अंगावर पडली होती. शेवटी, दौसा जिल्हाधिकारी देवेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत, बचाव पथकाला हुकच्या सहाय्याने आर्यनला बोअरवेलमधून बाहेर काढण्याची परवानगी देण्यात आली. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय पथक तैनात करण्यात आले होते. आर्यन बोअरवेलमधून बाहेर येताच त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र बोअरवेलमध्येच त्याचा मृत्यू झाला होता. मुलाच्या मृत्यूने त्याच्या आईची प्रकृती ढासळली आहे.