रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 15:07 IST2024-09-27T15:07:18+5:302024-09-27T15:07:39+5:30
Rajasthan News: राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्या मुलग्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आशू बैरवा हा उघड्या जीपमधून जात रील्स बनवताना दिसत आहे.

रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल
राजस्थानचे उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांच्या मुलग्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर सातत्याने व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा आशू बैरवा हा उघड्या जीपमधून जात रील्स बनवताना दिसत आहे. तसेच या जीपच्या आजूबाजूला सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस हे धावपळ करताना दिसत आहेत.
आशू बैरवा याच्यासोबत तीन इतर तरुणही दिसत आहेत. त्यामधील एकाचं नाव कार्तिकेय भारद्वाज असल्याचं समोर आलं आहे. कार्तिकेय हा काँग्रेसचे नेते पुष्पेंद्र भारद्वाज यांचा मुलगा आहे. त्यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याविरोधात सांगानेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. दरम्यान, मौजमजा आणि रील्स बनवण्यासाठी नेत्यांच्या मुलांना पोलिसांचं संरक्षण कुठल्या कारणानं मिळालं, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री असलेल्या प्रेमचंद बैरवा यांच्याजवळ परिवहन विभागाची जबाबदारी आहे. मात्र त्यांचाच मुलगा हात सोडून गाडी चालवून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवताना दिसत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये चार तरुण उघड्या जीपमधून जाताना दिसत आहेत. तसेच पावसात भिजून मौजमजा करत आहेत. त्यांच्या मागे मागे पोलिसांची वाहनंही धावत आहेत. कधी हे वाहन जीपच्या मागे तर कधी पुढे धावताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ कधीचा आहे, याबाबत नेमकी माहिती समोर येऊ शकलेली नाही.
ही जीप चालवत असलेला तरुण हा उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा यांचा मुगला असल्याचं सांगण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला बसलेला तरुण हा काँग्रेस नेते पुष्पेंद्र भारद्वाज यांचा मुलगा आहे. तसेच ही जीप काँग्रेस नेत्याची असल्याची माहितीही समोर आली आहे. काँग्रेस नेते पुष्पेंद्र भारद्वाज यांचा मुलगा कार्तिकेय भारद्वाज याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.