कौतुकास्पद; मुलांच्या शिक्षणासाठी गरीब दुधवाला सरसावला; आयुष्यभराची कमाई केली दान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 03:25 PM2023-03-21T15:25:20+5:302023-03-21T15:25:49+5:30
सरकारी शाळेत खोल्या अपुऱ्या पडत होत्या, बांधकामासाठी वृद्ध दुध विक्रेत्याने केली मोठी मदत.
डुंगरपूर: भविष्यात काही अडचण येऊ नये म्हणून लोक पैशांची बचत करतात. डुंगरपूर येथील एका वृद्धाने समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. राजस्थानच्या डुंगरपूरमधील 65 वर्षीय गरीब दूध विक्रेत्याने आपल्या आयुष्यभराची कमाई गावातील मुलांच्या शाळेसाठी दान केली. मादू रेबारी असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या या कृत्याचे संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे.
डुंगरपूर जिल्ह्यातील डोवडा ब्लॉकमधील सरकारी उच्च प्राथमिक शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे 115 विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र शाळेत चारच खोल्या आहेत. यातील एक खोली शाळेच्या मुख्याध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी आहे. स्टोअर हाऊससाठी एक खोली आहे. उरलेल्या दोन खोल्यांमध्ये आठ वर्ग बसवणे अवघड होत होते. शाळेची अडचण पाहून शाळेच्या मुख्याध्यापकांनी गावातील लोकांकडून देणगी घेण्याची योजना आखली.
त्यावर गावातून अडीच लाख रुपयांचा निधी जमा करून शाळेच्या हॉलचे बांधकाम करण्यात आले. मात्र पैसे अपुरे पडल्यामुळे बांधकाम अर्धवट राहिले. यानंतर एके दिवशी धानी घाटाळ गावच्या शासकीय शाळेचे मुख्याध्यापक महेश व्यास यांनी गावातील मादू रेबारी यांना शाळेच्या इमारतीची समस्या सांगितली. मुख्याध्यापक महेश व्यास यांनी सांगितले की, शाळेत हॉल आणि वर्गखोल्यांची कमतरता आहे, त्यामुळे मुलांच्या अभ्यासात मोठी अडचण येत आहे.
हे ऐकून मादू रेबारी यांनी शाळेला आर्थिक मदत करण्याचे ठरवले आणि दूध विक्रीतून मिळालेले तीन लाख रुपये ज्ञान संकल्प पोर्टलच्या माध्यमातून शाळेला दिले. यानंतर मदू रेबारी यांच्या प्रेरणेने इतर लोकांनीही पुढे येऊन शाळेतील बांधकामासाठी स्वेच्छेने देणगी दिली. मादू रेबारी यांना पत्नी आणि मुले नाहीत. एकाकी जीवन जगत ते पशुपालन आणि दूध विकून आपला उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत गावातील शाळेत शिकणाऱ्या सर्व मुलांना ते आपली मुले मानतात. भविष्यात शाळेला पुन्हा मदतीची गरज भासल्यास आपण आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करू असे मदू रेबारी यांनी सांगितले.