राजघराण्यातील भाजपा उमेदवार; मागील ५ वर्षात कोट्यधीशाहून झाली अब्जाधीश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 03:22 PM2023-11-05T15:22:04+5:302023-11-05T15:22:54+5:30
भाजपानं बीकानेर पूर्व मतदारसंघातून सिद्धीकुमारी यांना उमेदवारी दिली आहे.
जयपूर – राजस्थानात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार ना केवळ जाहीर सभा घेतायेत तर घरोघरी जाऊन मते मागतायेत. राज्यात काँग्रेसविरोधात भाजपा यांच्यात थेट लढत आहे. प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार जाहीर केलेत. उमेदवारही त्यांचे निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. याच उमेदवारी अर्जात दिलेल्या प्रतिज्ञापत्रातून विविध रंजक माहिती लोकांसमोर येत आहे.
भाजपानं बीकानेर पूर्व मतदारसंघातून सिद्धीकुमारी यांना उमेदवारी दिली आहे. सिद्धीकुमारी या ५ वर्षात कोट्यधीशातून अब्जाधीश बनल्या आहेत. २०१८ मध्ये सिद्धीकुमारी यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार एकूण ८.८९ कोटी रुपये होती. जी आता वाढून १.११ अब्ज रुपये झाली आहे. बीकानेर राजघराण्याची माजी महाराणी आणि सिद्धीकुमारी यांची आई सुशीलाकुमारी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीचा मोठा हिस्सा सिद्धीकुमारी यांना वारसाहक्काने मिळाला. ज्याची किंमत ८० कोटी रुपयांहून अधिक आहे.
मागील ५ वर्षात सिद्धी कुमारी यांच्या स्थावर मालमत्ता ३० लाखांहून वाढून ८५.७८ कोटी इतकी झाली आहे. सध्या त्यांच्याकडे १६.५२ कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे जी २०१८ मध्ये ३.६७ कोटी रुपये होती. इतर नेत्यांबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राशी तुलना केल्यास, माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या दागिन्यांमध्ये एक कोटी रुपयांची वाढ झाली आहे. २०१८ मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्याच्याकडे १.०८ कोटी रुपयांचे दागिने होते, जे यावेळी वाढून २.४० कोटी रुपये झाले. त्याच्याकडे असलेली रोकडही वाढली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्याकडे १.२९ लाख रुपयांची रोकड होती, ती यावेळी वाढून २.०५ लाख झाली आहे.
त्याचप्रमाणे बँकेत जमा केलेली रक्कमही पाच वर्षांत ५१.२४ लाख रुपयांवरून ५८.७४ लाख रुपयांवर पोहोचली आहे. पाच वर्षांपूर्वी त्यांच्यावर ५.३३ लाख रुपयांचे कर्ज होते ते आता फेडण्यात आले आहे. त्यांनी सिंधिया पॉटरीज अँड सर्व्हिसेसला १.१४ कोटी रुपये दिले आहेत. राजसमंद जिल्ह्यातील नाथद्वारा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आणि विद्यमान विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांची संपत्ती ३.७२ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे दागिन्यांच्या नावावर काहीही नाही. प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे केवळ ३६,५५१ रुपये रोख आहेत. तर १.०५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.