अरे देवा! "ना लग्न करुन देत, ना..."; घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 03:20 PM2024-07-20T15:20:38+5:302024-07-20T15:22:02+5:30

कुटुंबीयांवर नाराज असलेली मुलगी थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

rajasthan girl climbed water tank after upset her family bharatpur | अरे देवा! "ना लग्न करुन देत, ना..."; घरच्यांच्या त्रासाला कंटाळून पाण्याच्या टाकीवर चढली तरुणी

फोटो - ABP News

राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील मथुरा गेट पोलीस स्टेशन परिसरात कुटुंबीयांवर नाराज असलेली मुलगी थेट पाण्याच्या टाकीवर चढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी पाण्याच्या टाकीवर चढल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि सुमारे ४५ मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर पोलिसांनी समजावून सांगितल्यावर मुलीला टाकीवरून खाली उतरवण्यात यश आलं आहे. 

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे कुटुंबीय तिला शिक्षण घेऊन देत नाहीत आणि तिला शिवीगाळ करतात. त्यामुळे ती पाण्याच्या टाकीवर चढली. सध्या पोलीस मुलीची चौकशी करत आहेत. मथुरा गेट पोलीस स्टेशनचे अधिकारी करण सिंह राठोड यांनी सांगितलं की, मनी असं मुलीचं नाव असून तिने आई-वडील त्रास देत असल्याचं सांगितलं आहे. 

मुलीला बीएड करायचे आहे, पण कुटुंबीय तिच्या शिक्षणासाठी पैसे देत नाहीत. तसेच ते तिचं लग्नही लावून देत नाहीत. त्यामुळे घरच्यांचा राग अनावर होऊन ती पाण्याच्या टाकीवर चढली. त्यानंतर ४५ मिनिटांच्या समुपदेशनानंतर मुलगी पाण्याच्या टाकीवरून खाली उतरली.

मुलीने सांगितलं की, कुटुंबीय तिला काही ना काही कारणाने त्रास देतात. ते म्हणतात तू मरून जा, मी लग्न केलेलं नाही. मला माझ्या कुटुंबाकडून स्वातंत्र्य हवं आहे. मला त्यांच्यासोबत राहायचं नाही. माझे वडील रणवीर सिंह सैन्यातून निवृत्त झाले आहेत आणि त्यांना एक लहान बहीण आणि एक लहान भाऊ आहे.

आई राजेंद्री देवी आणि वडील रणवीर सिंह यांनी मारहाण केल्याने मनीला घरी जायचं नाही. ते सध्या भरतपूर शहरातील गांधी नगर येथे राहतात. मथुरा गेटचे एसएचओ सांगतात की, मुलीच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात अद्याप कोणी आलेलं नाही. आता मुलीला सेवर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
 

Web Title: rajasthan girl climbed water tank after upset her family bharatpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.