मोठी बातमी! 'पतंजलि'च्या खाद्यतेलात भेसळीची तक्रार, राजस्थानात कारखाना सील
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 10:57 AM2021-05-28T10:57:33+5:302021-05-28T10:58:09+5:30
अॅलोपॅथी उपचारांवर टीका केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) १ हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकल्यानंतर योगगुरू बाबा रामदेव आता राजस्थान सरकारच्या निशाण्यावर आले आहेत.
अॅलोपॅथी उपचारांवर टीका केल्याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशननं (आयएमए) १ हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकल्यानंतर योगगुरू बाबा रामदेव आता राजस्थान सरकारच्या निशाण्यावर आले आहेत. राज्यस्थान सरकारकडून काल रात्री उशिरा 'पतंजलि'च्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली. यावेळी मोहरीच्या तेलात भेसळ करण्यात येत असल्याचं उघडकीस आलं आहे. यापार्श्वभूमीवर 'पतंजलि'चा अल्वर येथील खाद्यतेल कारखाना सील करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईचं व्हिडिओ चित्रिकरणसुद्धा करण्यात आलं आहे. (Rajasthan Govt Seize Edible Oil Factory In Alwar After Allegations Of Adulteration In Patanjali Sarson Oil)
याआधी बाबा रामदेव यांची कंपनी असलेल्या पतंजलिकडून उत्पादन केल्या जाणाऱ्या मोहरीच्या तेलावर खाद्य तेल उद्योग संघटनेनं (एसईए) देखील आक्षेप घेतला होता. एसईएनं 'पतंजलि'च्या जाहिरातीवर आक्षेप घेतला होता. ज्यात इतर कंपन्यांच्या तेलात भेसळ असल्याचा दावा पतंजलिकडून करण्यात येत होता. दरम्यान, राजस्थानच्या अल्वर जिल्ह्यातील खैरथलमध्ये पतंजलि ब्रँडच्या मोहरी तेलाच्या उत्पादन प्रकल्पात तेलाचं पॅकेजिंग आणि भेसळ केली गेल्याची माहिती प्रशासनाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. प्रशासनाकडून सिंघानिया आयल मिलवर छापा मारला आणि कारखाना सील करण्यात आला. कारखान्यात 'पतंजलि'चे पॅकेट्स मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले आहेत.