'तो' हनुमान चालीसा पठण करत होता अन् डॉक्टर काढत होते ट्युमर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 05:26 PM2018-12-27T17:26:20+5:302018-12-27T17:29:10+5:30
राजस्थान येथील बीकानेरमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये रूग्ण हनुमान चालीसा पठण करत असतानाच डॉक्टरांनी त्याच्यावरील ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याचे वृत्त समोर आले आहे.
राजस्थान येथील बीकानेरमध्ये आश्चर्यचकित करणारी घटना घडली आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये रूग्ण हनुमान चालीसा पठण करत असतानाच डॉक्टरांनी त्याच्यावरील ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्याचे वृत्त समोर आले आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार, बीकानेरमधील डुंगरगड येथील रहिवासी असलेले एका 30 वर्षीय इसमाला गेल्या काही दिवसांपासून पक्षघाताचे झटके येत होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर बायॉस्पी केल्यानंतर रूग्णाला ग्रेड 2चा ब्रेन ट्युमर असल्याचे वैद्यकीय अहवालात निष्पन्न झाले. काही वैद्यकीय तपासण्यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला.
यासंदर्भात न्यूरो सर्जरीचे वरिष्ठ सल्लागार डॉ.के.के.बन्सल यांनी सांगितले की, रूग्णाच्या डोक्यातील एका भागात ट्युमर होता, यामुळे त्यांना बोलताना अडचणींचा सामना करावा लागत होता. बायॉस्पीमध्ये रुग्णाला ग्रेड 2 ब्रेन ट्युमर असल्याचे निष्पन्न झाले. शिवाय, त्यांच्यावरील शस्त्रक्रिया गंभीर स्वरुपाची होती. कारण डोक्यातील ज्या भागामध्ये ट्युमर झाला होता, त्यामुळे त्यांच्या बोलण्याची क्षमता जाण्याचीदेखील भीती होती.
याबाबत डॉ. के.के बन्सल यांनी पुढे असंही सांगितले की, आम्ही अन्य डॉक्टरांशी सल्लामसलत करुन रूग्णाला बेशुद्ध न करण्याचा निर्णय घेतला. आमचा हा निर्णय ऐकून सुरुवातीला रूग्ण घाबरला. सुरुवातीला त्यांनी शस्त्रक्रियेस नकार दिला, पण नंतर त्यानं तयारी दर्शवली. शस्त्रक्रियेदरम्यान आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत होतो आणि तो हनुमान चालीसा पठण करत होता.
लोकल अॅनेस्थेशियामुळे वेदना जाणवल्या नाही
शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णाला वेदना होऊ नये, यासाठी लोकल अॅनेस्थेशिया देण्यात आला. पण यामुळे तो बेशुद्ध झाला नाही. डॉ. के.के. बन्सल यांनी सांगितले की, रूग्णाचे हनुमान चालीसा पठण करणं आमच्यासाठीदेखील प्रचंड उपयुक्त ठरले. कारण यामुळे रूग्णाचे लक्ष विचलित झाले नाही आणि डॉक्टरांनाही यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पाडत त्याच्या डोक्यातील ट्युमर बाहेर काढला. शस्त्रक्रियेदरम्यान रूग्ण हनुमान चालीसा पठण करत असल्याची देशातील ही पहिलीच घटना असल्याचे म्हटले जात आहे.