राजस्थानातील अर्भक मृत्यूची हायकोर्टाने घेतली स्वत:हून दखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 06:15 AM2020-01-08T06:15:58+5:302020-01-08T06:16:04+5:30
राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची राजस्थान उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली
जयपूर : राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांत अर्भकांच्या झालेल्या मृत्यूची राजस्थान उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली असून, याप्रकरणी राज्य सरकारने आपले म्हणणे आणि सर्व माहिती न्यायालयाला सादर करावी, असे आदेश दिले आहेत. कोटा रुग्णालयातील अर्भकांच्या मृत्यूचे प्रकरण अगदी अलीकडचे आहे. त्या प्रकाराने केवळ राजस्थानातच नव्हे, तर संपूर्ण देशात खळबळ माजली. केंद्र सरकारने या प्रकरणाची माहिती राज्य सरकारकडून मागवून घेतली. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोटा रुग्णालयात केंद्रीय पथकही पाहणीसाठी पाठविले होते. हे पथक येणार असल्याचे कळताच राजस्थान सरकार जागे झाले. लगेचच राज्याचे आरोग्यमंत्री आणि नंतर उपमुख्यमंत्री सचिन पायलट हेही कोटा रुग्णालयात गेले. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून अर्भकांच्या मृत्यूची माहिती मागवून घेतली. तसेच असे प्रकार अजिबात होता कामा नयेत, असेही मुख्यमंत्र्यांना सांगितले. भाजपने तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली. बसपाप्रमुख मायावती यांनीही गेहलोत यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. बसपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये गेल्याने त्या संतापल्या आहेत.
>कुठे किती मृत्यू?
राजस्थानच्या बिकानेर येथील रुग्णालयात १६२ अर्भके आतापर्यंत मरण पावली असून, जोधपूरच्या सरकारी रुग्णालयात १४६ अर्भकांचा मृत्यू झाला आहे. कोटा येथील सरकारी रुग्णालयातील अर्भकांच्या मृत्यूची संख्या ११० आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेबु्रवारी रोजी होणार आहे.