बेपत्ता पोपटासाठी पत्नीनं खाणं-पिणंच सोडलं; डॉक्टरनं छापल्या लाखोंच्या जाहिराती, देणार मोठं बक्षीस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 06:05 PM2022-02-03T18:05:20+5:302022-02-03T18:11:55+5:30
या डॉक्टरांनी वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर मिसिंगची जाहिरातही छापून आणली. एवढेच नाही तर, शहरात पोस्टर लावण्यात आले आणि पॅम्प्लेटही वाटण्यात आले.
राजस्थानमधील सीकर शहरात पक्षीप्रेमाचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. शहरातील प्रसिद्ध हार्ट सर्जन डॉ.व्ही के जैन यांचा पोपट तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला. यानंतर त्यांच्या पत्नीने खाणे-पिणे सोडले आहे. पोपट शोधण्यासाठी या डॉक्टरांनी लाखो रुपये खर्च केले आहेत. विशेष म्हणजे, या डॉक्टरांनी वृत्तपत्राच्या पहिल्याच पानावर मिसिंगची जाहिरातही छापून आणली. एवढेच नाही तर, शहरात पोस्टर लावण्यात आले आणि पॅम्प्लेटही वाटण्यात आले. तसेच सोशल मीडियावर मेसेजही व्हायरल करण्यात आले.
माध्यमांतील वृत्तांनुसार, पोपटाचे मालक डॉक्टर व्ही. के. जैन म्हणाले की, ते पोपट शोधणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यासाठीही तयार आहेत. मात्र, प्रत्यक्ष जाहिरातीत "माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल," असे म्हणण्यात आले आहे. कुटुंबातील लोक आणि रुग्णालयातील कर्मचारी दिवस-रात्र पोपटाचा शोध घेत आहेत.
टेरेसवर सफरचंद खाऊ घालताना उडाला पोपोट -
डॉ. जैन यांच्या पत्नी डॉ. अर्चना यांनी सांगितले की, त्यांचे घर हॉस्पिटलच्या वर आहे. तीन दिवसांपूर्वी आम्ही टेरेसवर पोपटांना सफरचंद खाऊ घालत होतो. याचदरम्यान तो उडून गेला आणि परत आलाच नाही. आम्ही तीन दिवसांपासून पोपटाच्या शोधात होतो. त्याच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
दोन वर्षांपूर्वी 80 हजार रुपयांत विकत घेतली होती जोडी -
डॉ. जैन यांनी सांगितले की, दोन वर्षांपूर्वी आफ्रिकन ग्रे कलरच्या दोन पोपटांची जोडी 80 हजार रुपयांना विकत घेतली होती. यातील एका पोपटाचे नाव कोको असे होते. दोन वर्षांत कोको घरातील सदस्य झाला होता. त्याच्या जाण्याने घर सुने-सुने झाले आहे.
एक हजारहून अधिक शब्द बोलायचा पोपट -
हा पोपट दुर्मिळ प्रजातीचा असल्याचे डॉ. जैन सांगतात. विशेष म्हणजे, हा पोपट एक हजाराहून अधिक शब्द बोलतो. तो सर्वांशी बोलायचा, काही विचारले असता उत्तरही द्यायचा. तो गेल्याने मुलगा, सून आणि मुलगी अत्यंत दु:खी आहेत. तर पत्नी रडत त्याच्या येण्याची वाट बघत आहे.