Janmashtami 2022:देशातील एकमेव मंदिर जिथे श्रीकृष्णाला दिली जाते तोफेतून सलामी; 400 वर्षांपासून सुरू आहे प्रथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 07:13 PM2022-08-19T19:13:07+5:302022-08-19T19:32:23+5:30
Janmashtami 2022: जगप्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. कृष्ण जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातून भाविक येथे येतात.
Janmashtami 2022: फक्त भारतातच नाही, तर जगभरात भगवान श्रीकृष्णाचे भक्त आहेत. अनेक देशांमध्ये भगवंताची असंख्य मंदिरेही आहेत. पण, भारतात असे एक मंदिर आहे, जिथे जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला 21 वेळा तोफेची सलामी दिली जाते. 400 वर्षांपासून ही प्रथा चालत आली असून, देशभारतून हजारो भाविक दरवर्षी हे पाहण्यासाठी येतात.
राजस्थानमध्ये श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे, जिथे कृष्णाचे सात वर्षांच्या मुलाचे रुप विराजमान आहे. हे मंदिर राजस्थानमधील नाथद्वारा येथे आहे. जगप्रसिद्ध श्रीनाथजी मंदिरात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. जन्मोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी देशभरातून भाविक येथे पोहोचतात. जन्माष्टमीच्या सायंकाळी देवाची भव्य मिरवणूक काढली जाते. यात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते.
400 वर्षांपासून अनोखी परंपरा
विशेष म्हणजे कृष्णजन्मानिमित्त येथे एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता कृष्णाला 2 तोफेतून 21 वेळा सलामी दिली जाते. सुमारे चारशे वर्षांपासून रिसाला चौकात ही परंपरा सुरू आहे. ज्या दोन तोफांनी सलामी दिली जाते त्यांना नर व मादी तोफ म्हणतात. ही परंपरा पार पाडण्यासाठी मंदिर समिती आणि होमगार्ड यांना विशेष प्रशिक्षण दिले जाते.