धक्कादायक घटना! सरकारी रुग्णालयात महिला रुग्णाच्या डोळ्यांचा उंदराने घेतला चावा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 04:57 PM2022-05-17T16:57:20+5:302022-05-17T16:57:38+5:30
'खाद्यपदार्थ पडलेले असतात, म्हणून उंदीर येतात'; रुग्णालय व्यवस्थापनाचे बेजबाबदार वक्तव्य.
कोटा: राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांसोबत अनुचित प्रकार घडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. असाच एक प्रकार कोटाच्या सरकारी रुग्णालयातून समोर आला आहे. राजस्थानमधीलसर्वात मोठ्या रुग्णालयांपैकी एक असलेल्या कोटाच्या एमबीएसमध्ये एका महिला रुग्णाचा डोळा उंदराने खाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
रुग्णालयाचे बेजबाबदार वक्तव्य
कोटाच्या एमबीएसमध्ये घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालयात एकच खळबळ उडाली. ही घटना घडल्यानंतर घाईघाईत डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी महिलेच्या डोळ्यांना ड्रेसिंग केली. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेबाबत रुग्णालय व्यवस्थापनेने एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे. रुग्णांजवळ खाद्यपदार्थ पडलेले असतात, त्यामुळे तिथे उंदीर येतात, असं रुग्णालयाने म्हटलं आहे.
महिलेला पक्षाघाताचा त्रास
मिळालेल्या माहितीनुसार, जीबीएस सिंड्रोमने ग्रस्त रुपमती (30) सुमारे 45 दिवसांपासून एमबीएस रुग्णालयात दाखल आहेत. महिलेचा पती देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, त्याने आपल्या पत्नीला अर्धांगवायूचा झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना न्यूरो आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. मान हलवता येत नसल्यामुळे सुमारे 42 दिवस त्या व्हेंटिलेटरवर होत्या आणि दोन दिवसांपूर्वी महिलेला येथे हलवण्यात आले होते.
डोळ्यावर जखमा
देवेंद्रने सांगितले की, रात्री पत्नीच्या चेहऱ्यावर कपडा दिसला आणि ती रडू लागली. डोळ्यावरचा कपडा काढल्यानंतर चेहऱ्यावर रक्त दिसले. मी तात्काळ कर्मचारी व डॉक्टरांना कळवले. डॉक्टरांनी सांगितले की कुठला तरी कीटक चावला असेल. पण, डोळ्यावरची जखम मोठी असल्याने माझा डॉक्टरांवर विश्वास बसत नव्हता. पापणीचे दोन तुकडे झाले होते. कीटक चावल्यामुळे असे होत नाही. डॉक्टरांनी रात्री उपचार केले पण, सकाळी जखम उंदीर चावल्याने झाली असावी, असे डॉक्टर म्हणाले.