Lok Sabha Election Result 2024 : "पंतप्रधान मोदींनी आता त्यांचं नाव..."; अशोक गेहलोत यांची मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:47 PM2024-06-04T18:47:54+5:302024-06-04T18:56:20+5:30
Lok Sabha Election Result 2024 Ashok Gehlot And Narendra Modi : राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठी मागणी केली आहे.
Lok Sabha Election Result 2024 : राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मोठी मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक पूर्णपणे स्वत:वर केंद्रित केली. प्रचारात मोदीची गॅरंटी, पुन्हा एकदा मोदी सरकार यांसारखे शब्द हे भाजपा या शब्दापेक्षा जास्त ऐकायला आणि पाहायला मिळाले."
"खासदार उमेदवारांना बायपास करून मोदी गॅरंटीच्या नावाखाली संपूर्ण निवडणूक लढवण्यात आली. निवडणुकीत महागाई, बेरोजगारी, समाजातील वाढता तणाव हे मुद्दे गौण ठरले आणि फक्त मोदी-मोदी ऐकू येऊ लागले. पंतप्रधानांनी त्यांच्या नेतृत्वाखाली संसदेत भाजपाच्या 370 जागा आणि एनडीएच्या 400 जागा पार करण्याचा दावा केला होता."
"आता भाजपाला 370 जागा मिळणार नाहीत आणि एनडीएला 400 जागा मिळणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर भाजपाला स्पष्ट बहुमतही मिळवता आलेलं नाही. अशा स्थितीत नरेंद्र मोदी यांनी आता पंतप्रधानपदाच्या दावेदारीतून आपलं नाव मागे घ्यावं" असं अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.
राजस्थानमध्येही भाजपाचा पराभव
राजस्थानमध्ये भाजपाचं नुकसान होताना दिसत आहे, दुपारी 1.30 वाजेपर्यंत भाजपा राजस्थानच्या 25 लोकसभा जागांपैकी 14 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसने 8 जागांवर आघाडी घेतली आहे. याशिवाय सीपीआय एका जागेवर, आरएलटीपी एका जागेवर आणि भारत आदिवासी पार्टी एका जागेवर आघाडीवर आहे. तर गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्व जागा जिंकल्या होत्या.