हुंड्यात १ रुपया घेऊन वाहवा मिळवलेल्या पोलिसाला २ लाख रुपयांची लाच घेताना अटक, ACBची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2021 10:52 AM2021-12-18T10:52:58+5:302021-12-18T10:54:37+5:30
नार्कोटिक्स विभागात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेल्या अमन फोगट नावाच्या अधिकाऱ्याला जयपूर एसीबीच्या टीमनं २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे.
नार्कोटिक्स विभागात इन्स्पेक्टर पदावर कार्यरत असलेल्या अमन फोगट नावाच्या अधिकाऱ्याला जयपूर एसीबीच्या टीमनं २ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. अमन फोगट हे झुंझुनु जिल्ह्यातील सुजानगढ येथील बडसरी बास नावाच्या गावातील रहिवासी आहेत. अमन फोगट यांचं अडीच वर्षांपूर्वी याच गावात लग्न झालं होतं आणि हुंड्याची पूर्वापार चालत आलेल्या परंपरेला छेद देत केवळ १ रुपया घेत लग्न केलं होतं. जिल्ह्यात अमन फोगट यांचं त्यावेळी कौतुक देखील झालं होतं आणि त्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या होत्या. कुटुंबातही अमन यांच्या निर्णयाचं कौतुक केलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर अमन फोगट यांच्या वडिलांनी आपल्या सुनेला चारचाकी वाहन गिफ्ट म्हणून दिलं होतं. पण आता अमन फोगट याला लाच घेताना पकडल्याची बातमी कळाल्यानंतर गावात पुन्हा एकदा अमन हे चर्चेचं केंद्रस्थान बनले आहेत.
अमन फोगट यांचे वडील लष्करातील निवृत्त अधिकारी आहेत. अबकारी विभागात कार्यरत असलेल्या अमन फोगट यांचे वडील ओमप्रकाश फोगट यांनी अडीच वर्षांपूर्वी मुलाच्या लग्नात हुंडा न घेता याउलट आपल्या सुनेलाच चारचाकी वाहन गिफ्ट देत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. इतकंच नव्हे, तर लग्नावेळी गावात भोमाराम स्मृती येथे गावाचं प्रवेशद्वार देखील फोगट कुटुंबीयांनी उभारलं होतं. त्यासाठी जवळपास ३.५ लाख रुपये खर्च आला होता आणि याचंही उदघाटन फोगट कुटुंबाच्या नव्या सुनेच्या हस्ते करण्यात आलं होतं. गावात फोगट कुटुंबाला खूप मोठा मान आहे हे यावरुनच लक्षात येतं. पण मुलाच्या कारनाम्यामुळे संपूर्ण कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीला मिळाल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे.
जयपूर एसीबीच्या पथकानं अमन फोगट यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्या राहत्या घरी देखील झडती घेतली. एसीबीच्या पथकानं घरावर धाड टाकल्याची बातमी संपूर्ण गावात पसरली आणि संपूर्ण प्रकरण गावाला कळालं. ज्या कुटुंबाचं उदाहरण आदर्श कुटुंब म्हणून सर्व गावकरी आजवर देत आले होते. त्याच कुटुंबातील व्यक्तीच्या कारनाम्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे.
मेडिकल स्टोअरवर रंगेहाथ पकडला गेला अधिकारी
जयपूरच्या मेडिकल स्टोअरवर कारवाई करताना मेडिकल स्टोअरच्या मालकाकडून ५ लाख रुपये लाचेची मागणी अमन फोगट यांनी केली होती. पण अखेरीस २ लाख रुपयांची डील पक्की झाली होती. दुकानदारानं याची तक्रार एसीबीकडे केली. त्यानंतर एसीबीनं सापळा रचून अमन फोगट यांना रंगेहाथ पकडलं. एसीबीकडून वरीष्ठ अधिकाऱ्यांना या मिशनसाठी नियुक्त करण्यात आलं होतं. एसीपी कालूराम रावत यांच्या नेतृत्त्वाखाली एसीपी हिमांशु आणि एसपी सुरेश स्वामी यांच्या पथकानं अमन फोगट यांना रंगेहाथ पकडलं.