VIDEO: "सरकार पाडण्याचे प्रयत्न थांबवा; पंतप्रधान मोदीजी, हा तमाशा बंद करा"
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 06:48 PM2020-08-01T18:48:51+5:302020-08-01T18:49:07+5:30
राजस्थानात सत्ता संघर्ष सुरू; भाजपाकडून आमदार खरेदीचे प्रयत्न सुरू असल्याचा मुख्यमंत्री गेहलोत यांचा आरोप
जयपूर: राजस्थानमधील सत्ता संघर्ष अद्यापही सुरूच आहे. या सत्ता संघर्षात दररोज नव्या घटना घडत असल्याचं समोर येत आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर तो राजभवन, उच्च न्यायालयापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयातही पोहोचला. या प्रकरणात मुख्यमंत्री गेहलोत यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी संपर्क साधला. मात्र यानंतरही सत्ता संघर्ष थांबलेला नाही. त्यामुळे आता गेहलोत यांनी पुन्हा एकदा मोदींना आवाहन केलं. राज्यात सुरू असलेला तमाशा मोदींनी थांबवावा, असं गेहलोत म्हणाले आहेत.
गेहलोत यांच्या गटातल्या आमदारांना जयपूरहून जसलमेरला पाठवण्यात आलं. मुख्यमंत्री अशोक गेहलोतदेखील जसलमेरला पोहोचले. काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी घोडेबाजार केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला. मोदींनी राज्यात सुरू असलेला तमाशा बंद करावा, असं आवाहन त्यांनी केलं. 'भाजपाच्या प्रतिनिधींकडून सुरू असलेला आमदार खरेदीचं कारस्थान अतिशय मोठं आहे. ते इथे कर्नाटक, मध्य प्रदेशची पुनरावृत्ती करू पाहत आहेत. संपूर्ण गृह मंत्रालय याचसाठी काम करत आहे,' असा आरोप गेहलोत यांनी केला.
WATCH: ...Prime Minister should stop the 'tamasha' going on in Rajasthan. The rate for horse-trading has increased here. What 'tamasha' is this?: Rajasthan Chief Minister Ashok Gehlot in Jaisalmer pic.twitter.com/W9s9THllBJ
— ANI (@ANI) August 1, 2020
आमदारांसह जसलमेरला पोहोचलेल्या गेहलोत यांनी भाजपावर शरसंधान साधलं. 'आम्ही कोणाचीही फिकीर करत नाही. आम्ही लोकशाहीची फिकीर करतो, असं ते म्हणतात. आमचा संघर्ष कोणाच्याही विरोधात नाही. तो केवळ विचारधारेविरोधात आहे, असं ती मंडळा म्हणतात. पण लोकनियुक्त सरकार पाडण्याला विचारांची लढाई म्हणत नाहीत. आमचा लढा कोणत्याही व्यक्तीविरोधात नाही. तो केवळ लोकशाही वाचवण्यासाठी आहे,' अशी टीका गेहलोत यांनी केली.
देशातल्या जनतेनं नरेंद्र मोदींना दुसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी दिली. ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यांनी राजस्थानात सुरू असलेला तमाशा बंद करावा, असं आवाहन गेहलोत यांनी केलं. 'पंतप्रधान म्हणून मोदींनी राजस्थानात सुरू असलेला तमाशा बंद करावा. घोडेबाजाराचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. विधानसभा अधिवेशनाची घोषणा होताच त्यांनी रेट आणखी वाढवला आहे,' असं गेहलोत म्हणाले.