कर्तव्यनिष्ठेला सलाम! विद्यार्थ्यांसाठी उंटावरून प्रवास करताहेत शिक्षक; घरोघरी जाऊन देताहेत शिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 10:59 AM2021-07-13T10:59:45+5:302021-07-13T11:11:57+5:30
Teachers Go To Students Homes On Camels For Classes : स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नवी दिल्ली - देशातील कोरोना रुग्णांची संख्या ही तीन कोटींवर पोहोचली आहे. तर चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. लहान मुलांना कोरोनाची लागण होऊन नये यासाठी शाळा -महाविद्यालये देखील बंद ठेवण्यात आली आहे. ऑनलाईन क्लासेसवर अधिक भर दिला जात आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू करण्यात आले आहे. मात्र स्मार्टफोन, इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे अनेक विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित राहत आहेत. त्यांना शिक्षण घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशाच गरीब विद्यार्थ्यांसाठी काही जण पुढाकार घेत आहेत. याच दरम्यान एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
राजस्थानच्या बारमेरमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी चक्क उंटावरून प्रवास केला आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल आणि इंटरनेट सुविधेचा अभाव अशा विद्यार्थ्यांच्या घरी शिक्षक उंटावर बसून शिकवायला जातात. वाळवंटातील दुर्गम भागात विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या शिक्षकांनी उंटांची मदत घेतली आहे. सरकारी शाळांच्या माध्यमातून ही संकल्पना राबविली जात आहे. राजस्थान शिक्षण विभागाचे अधिकारी सौरव स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारण 75 लाख विद्यार्थ्यांपैकी अनेक जणांकडे मोबाईल नाही आहे.
"Out of 75 lakh students, many do not have mobile phones. So the state government decided that teachers will go to their homes once a week for class 1-8, and twice a week for class 9-12," says Saurav Swami, Director of Rajasthan Education Department pic.twitter.com/Pz1AZAtXfo
— ANI (@ANI) July 9, 2021
पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा आणि नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दोनवेळा घरी जाऊन शिकवावे असे ठरले. "आपण सध्या कठीण काळातून जात आहोत. मात्र या काळात आपण शिक्षणाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे शिक्षकांना देखील कमीत कमी अडचणी याव्यात यासाठी प्रयत्न केले जात आहेत" अशी माहिती सौरव स्वामी यांनी दिली आहे. सर्वत्र या शिक्षकांचं कौतुक केलं जात आहे. भीमथल या सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक रुप सिंह झाकड यांनी देखील शिक्षकांचे कौतुक केले आहे.
"हे शिक्षक नक्कीच कौतुकास पात्र आहेत. असे प्रयोग सातत्याने होत राहायला पाहिजेत. बारमेरमध्ये विद्यार्थ्यांकडे संसाधनांची कमी आहे. पण राज्य सरकारच्या निर्देशानंतर आम्ही गावकऱ्यांसोबत राहून अनेक वेगवेगळे प्रयोग करत आहोत" असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच हे काम दिसतं तितकं सोपंही नाही. दूरवर जाऊन विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये देखील प्रत्येक ठिकाणी अडचणी येत असतात. सुरुवातीला शिक्षकांना काही अडचणी आल्या पण त्यांनी यावर मात केल्याचं देखील म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.