राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांत राजेंना हादरा

By Admin | Published: August 20, 2015 11:22 PM2015-08-20T23:22:49+5:302015-08-21T00:12:26+5:30

राजस्थानच्या पालिका निवडणुकीतील ‘करा किंवा मरा’च्या लढाईत भाजपने काँग्रेसवर निसटती मात केली असली तरी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र दुष्यंत यांचा

Rajasthan quarrels in local elections | राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांत राजेंना हादरा

राजस्थानच्या स्थानिक निवडणुकांत राजेंना हादरा

googlenewsNext

शीलेश शर्मा, नवी दिल्ली
राजस्थानच्या पालिका निवडणुकीतील ‘करा किंवा मरा’च्या लढाईत भाजपने काँग्रेसवर निसटती मात केली असली तरी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचे पुत्र दुष्यंत यांचा गड मानल्या जाणाऱ्या झालाबाडमध्ये ३५ पैकी २२ जागा पटकावत काँग्रेसने हादरा दिला आहे. एकूण ३३५१ वॉर्डपैकी १४४३ वॉर्डवर ताबा मिळवित भाजपने पहिले स्थान कायम राखले आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि अपक्षांनी संयुक्तरीत्या १९०८ जागा पटकावत सत्ताधारी आघाडीच्या तोंडचे पाणी पळविले आहे. अजमेर महापालिकेवरही काँग्रेसने झेंडा फडकावला.
मध्य प्रदेश पालिका निवडणुकींनी निराशा पदरी पडलेल्या काँग्रेसला दिलासा देणारा निकाल राजस्थानने दिला आहे.
वसुंधरा राजे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ढोलपूर- झालावार मतदारसंघातील झालाबाड-झालरापाटन पालिकेत काँग्रेसची सत्ता सुनिश्चित झाली आहे. तेथे गेल्या १५ वर्षांपासून भाजपची एकखांबी सत्ता होती. राजस्थानमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला मध्य प्रदेशात पुन्हा अपयश कसे आले, या प्रश्नाचे उत्तर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना किंवा मध्य प्रदेशच्या प्रदेश नेतृत्वाला देता आलेले नाही. कमलनाथ, दिग्विजयसिंग, ज्योतिरादित्य आपसातील संघर्षात मश्गुल राहिले. या नेत्यांना दिल्लीतून उसंत मिळाली नाही. मध्य प्रदेशकडे ते कसे लक्ष देणार? आजही या राज्यात काँग्रेसला पुन्हा उभे करण्यासाठी वेळ देऊ शकणारा एकही प्रदेश नेता नाही. दुसरीकडे या पक्षाने सचिन पायलट यांना मैदानात उतरवून कार्यकर्त्यांची एकजूट घडवून आणली. प्रभारी सरचिटणीस गुरुदास कामत यांनीही पायलट यांच्या जोडीला परिश्रम घेतल्याचे हे फळ आहे.
मध्य प्रदेशातील चुकीची जाणीव राहुल गांधी यांनाही झाली आहे. राजस्थानच्याच धर्तीवर मध्य प्रदेशमध्येही बदल घडवून आणताना नेत्यांवर लगाम कसण्यासाठी ते लवकरच विचारमंथन करतील असे मानले जात आहे.

Web Title: Rajasthan quarrels in local elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.