भीषण अपघात! गायीला वाचवताना SUV झाली पलटी; चौघांचा मृत्यू, ५ जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2024 02:36 PM2024-08-03T14:36:02+5:302024-08-03T14:46:06+5:30
रात्री समोरून आलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात एक एसयूव्ही पलटी झाली. या अपघातात एसयूव्हीमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.
राजस्थानमधील कोटा विभागातील बारां जिल्ह्यातील भंवरगड-किशनगंज दरम्यान एक भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी रात्री समोरून आलेल्या गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात एक एसयूव्ही पलटी झाली. या अपघातात एसयूव्हीमध्ये प्रवास करणाऱ्या चार जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बारां पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्ग २७ वर भंवरगड आणि किशनगंज दरम्यान रात्री उशीरा हा भीषण अपघात झाला. माहिती मिळताच जिल्हाधिकारी रोहिताश कुमार सिंह तोमर आणि एसपी राजकुमार चौधरी घटनास्थळी पोहोचले आणि माहिती घेतली. यानंतर त्यांनी रुग्णालय गाठून जखमींची भेट घेऊन उपचार नीट करण्याच्या सूचना दिल्या. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचं मोठं नुकसान झालं आहे.
चार जणांचा मृत्यू
भंवरगडहून बारांच्या दिशेने हे लोक एसयूव्हीमध्ये येत होते, तेव्हा हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्ग पेट्रोलिंग पथक आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी जखमींना बारां जिल्हा रुग्णालयात नेलं. डॉक्टरांनी शाहबाद भागातील रामपूर उपरेटी गावचे रहिवासी लाखन सहारिया, फूलचंद सहारिया, हरिचंद मेहता आणि मध्य प्रदेशातील फतेहगढ पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी राजू सहारिया यांना मृत घोषित केलं.
या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन जणांवर किशनगंज रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर दोन जणांना बारां जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी येथेही एक अपघात झाला होता, त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. या महामार्गावर गुरांचा वावर होत असल्याने हे अपघाताचं कारण बनत आहे.