१७ कोटी कॅश, ६८ किलो चांदी आणि सोन्याची बिस्किटं ...; मंदिरातील दानपेटीत कोट्यवधींचं दान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 11:08 AM2024-06-12T11:08:01+5:302024-06-12T11:10:02+5:30
देवाला अर्पण केलेल्या वस्तुंमध्ये फक्त पैसेच नाही तर सोन्या-चांदीचे दागिने, सोन्याची बिस्किटं आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे.
राजस्थानच्य चित्तोडगडमधील सांवलिया सेठ मंदिर हे अत्यंत लोकप्रिय आहे. कृष्ण धाम संवलिया सेठ मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. लोक आपल्या श्रद्धेनुसार देवाला नैवेद्य दाखवतात किंवा मग दानपेटीमध्ये पैशांसह मौल्यवान वस्तू अर्पण करतात. मात्र महिन्याच्या शेवटी हे दान इतकं होतं की मोजण्यासाठी बरेच दिवस लागतात. तसेच या कामासाठी अनेक लोक देखील असल्याचं पाहायला मिळतं
देवाला अर्पण केलेल्या वस्तुंमध्ये फक्त पैसेच नाही तर सोन्या-चांदीचे दागिने, सोन्याची बिस्किटं आणि इतर अनेक गोष्टींचा समावेश आहे. मे-जून महिन्यात मंदिरातील दानपेटी उघडली असता त्यात १७ कोटी रुपये आणि सुमारे २ किलो सोने-चांदी आढळून आली. याशिवाय १५ सोन्याची बिस्किटंही सापडली आहेत. या गोष्टींची मोजणी ही चार फेऱ्यांमध्ये पूर्ण होऊ शकते असं म्हटलं जातं.
कृष्ण धाम सांवलिया सेठ मंदिराची दानपेटी ५ जून रोजी उघडण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. प्रत्येक फेरीमध्ये ही रक्कम वाढत गेली. चार फेऱ्यांनंतर अंदाजे १३.४८ कोटी रुपये मोजले गेले. याशिवाय ऑनलाइन आणि इतर माध्यमातून ३.६५ कोटी रुपये मिळाले. म्हणजेच एकूण तब्बल १७.१३ कोटी रुपये मिळाले. रोख रकमेसह १.८४ किलो सोनं मिळालं. यामध्ये दागिने, बिस्किटं इत्यादींचा समावेश आहे.
एका भक्ताने भक्तीभावाने प्रत्येकी १०० ग्रॅमची १५ बिस्किटे अर्पण केली. चांदीचे दागिनेही मोठ्या प्रमाणात मिळाले आहेत. सांवलिया सेठ मंदिरातील दानपेटी ६८ किलो चांदी मिळाली आहे. दानपेटी उघडल्यानंतर रक्कम मोजण्यासाठी अनेक लोक आहेत. नोटांचे बंडल बनवून एका ठिकाणी ठेवले जातात. रोख रक्कम मोजत असतानाचे अनेक फोटो समोर आले आहेत.