राजस्थानच्या राजसमंदमध्ये पोलिसावर तलवारीने हल्ला; NIA ने हाती घेतला उदयपूर प्रकरणाचा तपास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 05:05 PM2022-06-29T17:05:06+5:302022-06-29T17:06:05+5:30
Udaipur Murder: उदयपूर प्रकरणातील दोन्ही आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दहशतवादी दृष्टिकोनातूनही तपास केला जात आहे.
उदयपुर:राजस्थानच्या उदयपूरमध्ये टेलर कन्हैयालालच्या हत्येवरून झालेल्या गदारोळात राजसमंदच्या भीमा भागात पोलीस कॉन्स्टेबलवर तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. उदयपूर घटनेच्या विरोधात भीमा भागात लोक निदर्शने करत होते. पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना अडवले असता जमावातील एका व्यक्तीने तलवारीने गळ्यावर हल्ला केला. यानंतर गंभीरावस्थेत कॉन्स्टेबलला अजमेरला रेफर करण्यात आले आहे.
कॉन्स्टेबल संदीप चौधरी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाचीची झाली. यानंतर परिसरात तणाव वाढला, लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांनीही यावेळी पोलिसांवर दगडफेक केली. विशेष म्हणजे, दोन्ही कन्हैयायाल यांचे मारेकरी याच भीमामध्ये पकडले गेले आहेत.
NIA प्रकरणाचा तपास करणार
दरम्यान, उदयपूरमधील प्रकरणाचा तपास NIA ने हाती घेतला आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय, या प्रकरणाचा दहशतवादी दृष्टिकोनातूनही तपास केला जात आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनीही आज संध्याकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावून परिस्थितीवर चर्चा करणार आहेत.
कन्हैयालालच्या अंत्ययात्रेला लोक जमले होते
मंगळवारी हत्या झालेल्या कन्हैयालालवर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. शहरातील कर्फ्यूनंतर त्यांच्या शेवटच्या प्रवासासाठी मोठी गर्दी जमली होती. लोकांनी मारेकऱ्यांना फाशी द्या अशा घोषणा दिल्या. कन्हैयाच्या हत्येच्या निषेधार्थ शहरही बंद ठेवण्यात आले होते.
कन्हैयाची हत्या कशी आणि का झाली?
10 दिवसांपूर्वी नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या कन्हैयालालची तालिबानी पद्धतीने हत्या करण्यात आली. मंगळवारी भरदिवसा रियाझ अन्सारी आणि मोहम्मद घौस दुकानात शिरले आणि कपडे शिवण्याच्या बहाण्याने कन्हैयालालवर तलवारीने अनेक वार करून गळाही चिरला. यानंतर कालच पोलिसांनी आरोपींना राजसमंद येथून अटक केली. याशिवाय अन्य 3 जणांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये पोलिसात तक्रार करणारा कन्हैयालालचा शेजारी नाझीमही आहे.
शरीरावर 26 खुणा, गळ्यावर 8 ते 10 वार
बुधवारीच कन्हैयालालचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरावर 26 जखमांच्या खुणा आढळल्या आहेत. 8 ते 10 जखमा फक्त गळ्यावर होत्या. कन्हैयाचा गळा चिरून वेगळा केल्याचे पीएम रिपोर्टमध्ये समोर आले आहे.