महिलाराज असलेलं देशातील दुसरं रेल्वे स्टेशन प्रवाशांच्या सेवेत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 10:07 PM2018-02-25T22:07:02+5:302018-02-25T22:07:02+5:30
देशात महिला सक्षमीकरणाचे जोरदार वारे वाहत असून, आता सकारात्मक बदलही पाहायला मिळतायत. मुंबईतल्या माटुंग्यापाठोपाठ राजस्थानमधल्या गांधीनगर रेल्वे स्थानकातही सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.
जयपूर- देशात महिला सक्षमीकरणाचे जोरदार वारे वाहत असून, आता सकारात्मक बदलही पाहायला मिळतायत. मुंबईतल्या माटुंग्यापाठोपाठ राजस्थानमधल्या गांधीनगर रेल्वे स्थानकातही सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे महिलाराज असलेलं हे रेल्वे स्टेशन आजपासून प्रवाशासांठी खुलं करण्यात आलं आहे. प्रत्येक पोस्टवर महिलांचा वरचष्मा असलेलं हे राजस्थानमधल्या गांधीनगरच दुसरं स्टेशन म्हणून समोर आलं आहे. गांधीनगर स्थानकावर स्टेशन अधीक्षकापासून मुख्य तिकीट कलेक्टरपर्यंत 32 वेगवेगळ्या पदांवर महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या शिपाई आणि स्टेशन मास्टरपासून रिझर्व्हेशन क्लार्कपर्यंतच्या पदांवर महिलांची निवड करण्यात आली आहे.
Rajasthan: Gandhinagar Railway Station emerging as the state's first railway station to be operated by women staff; members of the staff say 'this is a new experience for us, we will make most of it & prove our efficiency'. pic.twitter.com/zBjCjojSyt
— ANI (@ANI) February 25, 2018
गांधीनगर रेल्वे स्टेशनवरून दररोज जवळपास 7 हजार प्रवाशांची ये-जा असते. या स्टेशनवरून नेहमीच 50हून अधिक एक्स्प्रेसची ये-जा असते. तर त्यातील 25 एक्स्प्रेस मेलला स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. स्टेशन मास्टर अँजेला स्टेला यांनी सांगितलं की, रेल्वेतील माझ्या नोकरीच्या कार्यकाळाला एक वर्षं पूर्ण झालं आहे. स्टेशनवर आजपासून सर्व ठिकाणी महिलाचं कार्यरत असणार आहेत, त्याचा मला आनंद आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर नियमांचं काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी मी कटिबद्ध असेन.
मुंबईतल्या माटुंगा रेल्वे स्टेशनवरही महिलांचाच वरचष्मा
मुंबईत मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातील सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानकाच्या सुरक्षेसाठीही रेल्वे सुरक्षा बलाच्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात ४ फलाट आहेत. माटुंगा स्थानकातील सर्व कामकाज ३० महिला अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे चालवत आहेत. यात महिला स्टेशन मास्तरसह ११ बुकिंग क्लार्क, ७ तिकीट तपासनीस, २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, २ उद्घोषणा करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अन्य कामांसाठी ५ कर्मचारी यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ५ महिला अधिकारी-कर्मचारी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली होती.
महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीने नेहमी अत्याधुनिक प्रयोग करण्यात येतात. त्या धर्तीवर माटुंगा स्थानक महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रवाशांकडूनदेखील या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माटुंगा स्थानकाप्रमाणे भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वे आणखी प्रयत्न करणार आहे, असे मध्य रेल्वेचे नवनियुक्त मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले होते.