राजधानी, दुरांतो आणखी सुखावह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:50 AM2018-04-20T00:50:44+5:302018-04-20T00:50:44+5:30
एसी थ्री टायर डबे वाढणार; रेल्वे लवकरच करणार अंमलबजावणी
नवी दिल्ली : रेल्वेने काही राजधानी व दुरांतो एक्स्प्रेसमधील एसी टू टायर डबे काढून तिथे एसी थ्री टायर डबे लावण्याचे ठरवले आहे. लवकरच हे बदल करण्यात येणार आहेत.
या गाड्यांमधील एसी टू टायरपेक्षा एसी थ्री टायरला अधिक पसंती असल्याचे रेल्वेला आढळून आले आहे. म्हणजेच एसी थ्री टायरच्या प्रवाशांची संख्या अधिक असते, तर काही वेळा एसी टू टायरच्या डब्यात प्रवासी अतिशय कमी असतात. विशेषत: रेल्वेने फ्लेक्सी फेअर व डायनॅमिक प्रायजिंग संकल्पना राबवण्यास सुरुवात केल्यानंतर एसी टू टायरमधून मिळणारे उत्पन्न खूपच घटले. त्यामुळे एसी थ्री टायरमधूनच रेल्वेला अधिक महसूल मिळतो.
शिवाय अनेकदा या मार्गांवर विमानांचे भाडे एसी टू टायरपेक्षा कमी असते, असे दिसून आले आहे. एसी थ्री टायरचा प्रवास मात्र लोकांना परवडतो. त्याचमुळे हा निर्णय घेतल्याचे रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र नवे एसी थ्री टायरचे डबे नेमके केव्हा लावून पूर्ण होतील, हे सांगणे आताच शक्य नाही, असे हा अधिकारी म्हणाला.