राजेश मूणत यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, छत्तीसगड सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 09:01 PM2017-10-28T21:01:05+5:302017-10-28T21:02:10+5:30
नवी दिल्ली- छत्तीसगडचे मंत्री राजेश मूणत यांच्या कथित सेक्स सीडी प्रकरणाची आता सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. रमण सिंह सरकारने शनिवारी यासंदर्भातील निर्णय घेतला आहे. कॅबिनेटच्या बैठकित सीबीआय चौकशीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे. छत्तीसगडचे मंत्री प्रेम प्रकाश पांडे यांनी पत्रकार परिषदेत यासंदर्भातील माहिती दिली आहे. सेक्स सीडी हे एक राजकीय षडयंत्र आहे. याआधी राजेश मूणत यांनी ही सीडी बनावट असल्याचं सांगितलं होतं. याप्रकरणी रायपूर पोलिसांच्या एका पथकाने ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली पत्रकार विनोद वर्मा यांना अटक केली आहे.
Cabinet has decided to give this entire case to the CBI for probe: Prem Prakash Pandey, Chhattisgarh Minister #CDRowpic.twitter.com/yZ16Pi9rbS
— ANI (@ANI) October 28, 2017
सेक्स सीडी प्रकरणी पत्रकार विनोद वर्मा यांना अटक
प्रसिद्ध पत्रकार विनोद वर्मा यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली. गाजियाबादमधील इंदिरापुरम परिसरात असणाऱ्या त्यांच्या घरातून पोलिसांनी विनोद वर्मा यांना अटक केली. रायपूर पोलिसांच्या एका पथकाने ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली विनोद वर्मा यांना अटक केली आहे. विनोद वर्मा एक वरिष्ठ पत्रकार असून, त्यांनी बीबीसीसाठी काम केलं आहे. आपल्या छत्तीसगड सरकारमधील मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी असल्याने अटकेची कारवाई करण्यात आल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे. पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरातून 500 सीडी, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह सापडलं असल्याचं सांगितलं . या सर्व सीडी वाटण्यात येणार होत्या असा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र सीडीमध्ये नेमकं काय आहे याबद्दल सांगण्यास त्यांनी नकार दिला. माझ्याकडे छत्तीसगडचे मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी आहे. त्यामुळेच छत्तीसगड सरकार माझ्यावर नाराज आहे', असं विनोद वर्मा यांनी न्यायालयात नेलं जात असताना पत्रकारांना सांगितलं. आपल्याला जाणुनबुजून फसवलं जात असल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे. 'ही सीडी पब्लिक डोमेन असून, आपला याच्याशी काही संबंध नाही', असंही त्यांनी सांगितलं आहे.
सीडी बनावट असल्याचा राजेश मूणत यांचा दावा
राजेश मूणत यांनी ही सीडी बनावट असल्याचा दावा केला असून, तुम्हाला हवं असेल त्यांना तपास करायला सांगा असं सांगत आव्हान दिलं. पत्रकार परिषदेत राजेश मूणत यांनी सांगितलं की, 'सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सीडीबद्दल माहिती मिळाली असून, ही पुर्णपणे बनावट आहे. ज्या एजन्सीला तपास करायला सांगायचं आहे त्यांना सांगा. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत'. छत्तीसगड भाजपाने विनोद वर्मा यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते पत्रकार आहेत की काँग्रेसचे एजंट असा प्रश्न विचारला आहे.